द अप्रेंटिसचा ट्रेलर जारी
ट्रम्प यांची कहाणी पहायला मिळणार
अमेरिकेत सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यावेळी डेमोक्रेटिक पार्टीच्या कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मुकाबला होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नाव द अप्रेंटिस असून याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
चित्रपटात ट्रम्प यांच्या प्रारंभिक व्यावसायिक जीवनाची कहाणी पहायला मिळणार आहे. तसेच त्यांच्या जीवनाशी निगडित काही वादग्रस्त घटनाही दर्शविण्यात येणार आहेत. ट्रेलरच्या प्रारंभी ट्रम्प अन् वकिलाची भेट दाखविण्यात आली आहे. यात ट्रम्प वकिलाला तुम्ही नेहमी खटले कसे जिंकता असा प्रश्न विचारतात. यावर उत्तरादाखल वकील तीन नियम असल्याचे सांगतो, पहिला नियम अटॅक, दुसरा नियम कधीच काही मान्य करू नका, सर्वकाही नाकरा आणि तिसरा नियम म्हणजे विजयाचा दावा करा आणि कधीच हार मानू नका असे वकील सांगत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.
या चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बासी यांनी केले आहे. यात सेबेस्टियन स्टेन यांनी ट्रम्प यांची भूमिका साकारली आहे. तर जेरेमी स्ट्राँगने वकील रॉय कोहनची भूमिका पार पाडली आहे. याचबरोबर मारिया बाकलोवा, बेन सुलिवन, चार्ली कॅरिक आणि मार्टिन डोनोवन हे कलाकारही दिसून येतील. हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.