For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवविरोधकांकडून खुद्द मंत्र्यांवरच दगडमाती

12:28 PM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवविरोधकांकडून खुद्द मंत्र्यांवरच दगडमाती
Advertisement

चर्चेच्या बहाण्याने येऊन फेकली दगडमाती : पाद्रीभाट-नेसाय येथे शिवजयंतीला गालबोट,पुतळ्याचा कोणालाही त्रास नसतानाही विरोध

Advertisement

मडगाव : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पाद्रीभाट-नेसाय येथे अनावरण करण्यासाठी आलेल्या पुरातत्व व पुराभिलेखमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर आंदोलनकर्त्यांनी दगडमाती फेकण्याचा गलीच्छ प्रकार पाद्रीभाट येथे घडल्याने त्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले, मात्र याप्रकरणी मंत्र्यांनी स्वत: काही प्रमाणात जखमी होऊनही सामंजस्याची भूमिका घेत या संतापजनक प्रकाराविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याचे टाळले. काल सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला. या धावपळीत प्रेडी त्रावासो ही सामाजिक कार्यकर्ती जमिनीवर पडल्यानंतर काही आंदोलक तिच्या अंगावरुन गेल्याने ती जखमी झाली. तिच्यावर इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.

मंत्र्यांवर फेकली दगडमाती

Advertisement

पुतळ्याच्या अनावरणासाठी आलेल्या मंत्री फळदेसाई यांच्याकडे चर्चा करण्याच्या बहाण्याने आलेल्या काही स्थानिकांनी अचानकपणे त्यांच्यावर माती तसेच दगड फेकले. या प्रकारामुळे मंत्री काही प्रमाणात जखमी झाले आहेत.

अगोदरच होता कडक बंदोबस्त

यावेळी असा काही प्रकार घडेल याची कल्पना प्रशासनाला होती आणि म्हणूनच या जागी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांमध्ये महिलावर्गाचा भरणा अधिक होता. त्यांना हाताळण्यासाठी महिला पोलिसांबरोबरच पिंक फोर्सच्या महिला पोलीसही होत्या.

पायी चालत जाताना साधली संधी

ज्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे, ती जागा गुडी-मडगाव या राज्य महामार्गापासून बऱ्याच अंतरावर आहे. म्हणून मंत्री फळदेसाई यांनी आपली कार मुख्य रस्त्यावर ठेऊन त्या जागी पायी जात असताना आंदोलनकर्त्यांनी संधी घेतली आणि त्यांच्यावर माती फेकली. फळदेसाई हे पांढऱ्या रंगाच्या कपड्यांत आले होते. आंदोलनकर्त्यांनी लांबून माती फेकल्याचे पाहून पोलीस संरक्षणार्थ त्यांना तेथून अन्यत्र हलविण्यात आले. या एकंदर प्रकरणासंबंधी बोलताना मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, दोन धर्मियांमध्ये तेढ नको, या एकमेव कारणास्तव आपल्यावर दगडफेक करुनही आपण  तक्रार केलेली नाही.

पुतळ्याला विरोध नेमका कोणाचा?

मंत्री फळदेसाई म्हणाले की, ज्या जागेत छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे, ती जागा एका व्यक्तीची खासगी जागा आहे. ज्या जागी हा पुतळा उभारण्यात आला आहे ती जागा मुख्य रस्त्यापासून सुमारे 350 मीटर अंतर्गत भागात आहे. इतकेच नव्हे तर या जागेपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर एकही घर नाही. त्यामुळे पुतळ्याला होणारा हा विरोध नेमका कोणाचा? असा सवाल निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

आंदोलकांना राजकीय फूस

ज्या जागेत पुतळा उभारलेला आहे तो एका तात्पुरत्या स्वरुपाच्या आखाड्यात उभारला आहे. कायम स्वरुपी नव्हे. ही आंदोलक मंडळी अशा प्रकारचे काम कोणत्या कायद्याखाली रोखतात ते स्पष्ट होत नाही आणि यावरुन कोणीतरी राजकीय व्यक्ती या लोकांना भडकावत असल्याचा आरोप फळदेसाई यांनी केला. या परिसरात इतका मोठा पोलीस फौजफाटा प्रथमच पाहून रस्त्यावरुन वाहने घेऊन जाणाऱ्या अनेकांनी भुवया उंचावल्या व प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करीत असताना अनेकदा वाहनांच्या रांगा लागल्या. शेवटी एका दुचाकीवरुन दोन वाहतूक पोलीस आले. मडगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई, मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक अरुण गावस, मडगावचे निरीक्षक तुळशीदास नाईक, कुंकळ्ळीचे निरीक्षक डायगो ग्रासियस व अन्य पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शिवाय सासष्टीचे मामलेदार उपस्थित होते.

तेढ नको म्हणून पोलीस तक्रार केली नाही : फळदेसाई

मंत्री फळदेसाई म्हणाले की, आंदोलक मंडळी आपल्याशी बोलणी करु पाहत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला सांगितले. तेव्हा हे प्रकरण सुटत असेल तर बोलणी करायला हरकत नाही असे ठरवून आपण बोलणी करण्यासाठी तयार झालो. प्रत्येक गटाच्या 5 व्यक्ती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसून यावर चर्चा करु असा प्रस्ताव आपण ठेवला. त्याचवेळी अचानकपणे आपल्यावर दगड फेकण्यात आले. मातीही फेकण्यात आली. किरकोळ जखमी होऊनही दोन धर्मियांमध्ये तेढ नको म्हणून आपण तक्रार केली नसल्याचे फळदेसाई यांनी सांगितले आणि लोकांनी शांतता पाळावी असे आवाहन केले.

शिवाजी महाराजांच्या नावाने गुंडगिरी : गोवा फॉरवर्ड, आप, काँग्रेसचा आरोप

सध्या गोव्यात काहीजणांना धार्मिक कलह निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी शिवाजी महाराजांसारख्या राजाचे नाव वापरले जात आहे. सध्या जे काही चालू आहे ते पाहिल्यास शिवाजी महाराजांच्या नावावर काहीजण गुंडगिरी करत असून दुर्दैवाची बाब म्हणजे, या गुंडगिरीला प्रशासन आणि पोलिसांचे अभय मिळत आहे, असा आरोप गोवा फॉरवर्ड, आप आणि काँग्रेस पक्षातील मराठा समाजातील नेत्यांनी सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. सां जुझे दि आरियल या भागात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यावरून तणाव निर्माण झाला आहे. सोमवारी तेथे झालेल्या धक्काबुक्कीत गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी फ्रेडी त्रावासो हे जखमी झाले. या घटनेचा निषेध करण्यासाठी गोवा फॉरवर्डचे विकास भगत, आपचे संदेश तेलेकर आणि काँग्रेसचे अॅड. विराज नागवेकर यांनी लोहिया मैदानावर पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा निषेध केला. मुळात हा पुतळा उभारण्यासाठी पंचायतीने अजून परवानगी दिलेली नाही. त्यामुळे हा पुतळा बसविणे बेकायदेशीर बाब ठरते. या बेकायदेशीर उपक्रमाचे उद्घाटन करून या कृतीला समर्थन देण्यासाठी गोवा सरकारातील एक मंत्री कसे जाऊ शकतात, असा सवाल या तिन्ही नेत्यांनी केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात लक्ष घालून या बेकायदेशीर कृत्याला पाठिंबा देणाऱ्यांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी त्यांनी केली.

विकास भगत यांनी यावेळी बोलताना सांगितले की, हा पुतळा बेकायदेशीररीत्या उभारला जात असल्यामुळे गावचे लोक मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडे खुलासा मागण्यासाठी आले होते. यावेळी फ्रेडी त्रावासो यांनी मंत्र्यांना जाब विचारला म्हणून तिथे उपस्थित असलेल्या काही गुंड प्रवृत्तींच्या युवकांनी त्यांना खाली पाडून अक्षरश: पायाखाली चिरडले, असा आरोप त्यांनी केला. त्या भागातील लोकांचा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास विरोध नाही. मात्र हा पुतळा कायदेशीररीत्या उभारावा एवढीच त्यांची मागणी आहे, असे त्यांनी सांगितले. वास्तविक एका बिल्डरला या जागेत बेकायदेशीररीत्या प्लॉट विकसित करायचे आहेत आणि तिथे जाण्यासाठी रस्ता तयार व्हावा यासाठीच या जंगलसदृश भागात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला असून ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, असा दावा भगत यांनी केला. आपचे संदेश तेलेकर यांनी, बजरंग दलाचे नेते विराज देसाई यांचा या गुंडगिरीमागे हात असून मुख्यमंत्र्यांनी त्यांना अटक करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी केली. शिवाजी महाराजांच्या नावाखाली जर गुंडगिरी होत असेल, तर ती आम्ही खपवून घेणार नाही, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.