हणकोण येथील श्री सातेरीदेवीच्या वार्षिकोत्सवाला उत्साहात सुरुवात
दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासून रांगा : आजपासून महाप्रसाद-भजन कार्यक्रम
कारवार : कारवार तालुक्यातील हणकोण येथील सुप्रसिद्ध श्री सातेरीदेवीच्या सात दिवसीय वैशीष्ट्यापूर्ण नव्याच्या वार्षिकोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. देवालयाच्या परंपरेनुसार गेल्या 22 तारखेला मध्यरात्री बारा वाजता मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा उघडण्यात आला. त्यानंतर देवीला नवे अर्पण करण्यात आले आणि उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. काल शनिवार (ता. 23) कुळावी कुटुंबीयासाठी राखीव ठेवण्यात आला होता. त्यादिवशी कुळाव्यांच्या स्त्रियांनी व कुमारिकांनी अडेकी आणि पुरूषांनी तळई अर्पण करण्याचा पारंपरिक आणि वैशिष्ट्यापूर्ण सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक स्त्रिया, कुमारिका आणि पुरूष सहभागी झाले होते. उत्सवाचा रविवारी तिसरा दिवस असून उत्सवाची सांगता हाईतोपर्यंत (28 सप्टेंबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत) मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.
देवीच्या दर्शनासाठी ओटी भरण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासून रांगा लागल्या होत्या. यामध्ये कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रसह अन्य राज्यांतील भाविकांचा समावेश होता. देवीला अर्पण करण्यात आलेल्या विविध स्वरूपांच्या वस्तुंचा लिलाव होत असल्याचे दिसून आले. देवस्थानकडून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराला जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक दुकाने थाटण्यात आली असून या दुकानांमध्ये मोठी उलाढाल होत असल्याचे दिसून आले. उत्सवासाठी दाखल झालेल्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान कमिटी आणि अनेक स्वयंसेवक झटत आहे. उद्या (ता. 25) पासून 28 तारखेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (ता.24) पासून 27 तारखेपर्यंत रात्री 7 ते 9 वाजेपर्यंत भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.