कुडलच्या पुरातन हरिहरेश्वर मंदिराला लाभतेय पुनर्वैभव
दक्षिण सोलापूर / बिसलसिद्ध काळे :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग-कुडल येथे वसलेले हेमाडपंथी हरिहरेश्वर मंदिर हे एक अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तु आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेले हे ठिकाण, सीना-भीमा नद्यांच्या संगमस्थळी आणि मराठी-कन्नड भाषिक संस्कृतीच्या मिलाफाचे प्रतीक मानले जाते. आज या मंदिराला पुनर्वैभव प्राप्त होत असून मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण आणि पुनर्बांधणीची कामे सुरू आहेत. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही या परिसराकडे लोकांचा कल वाढताना दिसतो आहे.
हे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण बसवेश्वरांची तपोभूमी मानले जाते. महात्मा बसवेश्वरांनी जवळच्या मंगळवेढा येथे अनेक वर्षे नोकरी केली होती आणि या परिसरात भक्ती चळवळ घडवली होती, असे त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे. मंदिराजवळ असलेल्या गुहेतील समाधी स्थान हे बसवेश्वरांचे गुरु ज्यात-वेदक मुनि यांचे असल्याचे जाणकारांचे मत आहे.
चालुक्य राजांच्या काळात बांधलेल्या मंदिरांपैकी हे एक महत्त्वाचे स्थान मानले जाते. त्यामुळे सिद्धारामेश्वर, अल्लमप्रभु, अक्कमहादेवी, चन्नमल्लिकार्जुन तसेच इतर मराठी भाषिक संतांनीही या मंदिराला भेट दिली आहे. ‘हिरे-कुडल’ या नावाने ओळखले जाणारे हे ठिकाण देवस्थान उभारणीच्या दृष्टीने संत गाडगेबाबा आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनकार्याशी सुसंगत वाटते.
पूर्वी मंदिराच्या सभोवती ब्राह्मणांची घनवस्ती होती. परंतु कल्याण क्रांतीनंतर असुरक्षिततेच्या भीतीने त्यांनी स्थलांतर केल्याचे येथील स्थानिक सांगतात. कैकाडी महाराज यांच्या धर्मपत्नी विठ्ठलाई यांनी येथे तीन महिने अनुष्ठान केल्यावर संत गाडगे महाराज यांनी ७ फेब्रुवारी १९५६ रोजी येथे भेट देऊन सेवा केली होती. त्या वेळची कार्यक्रम पत्रिका आजही देवस्थानात उपलब्ध आहे.
या मंदिरात ३५९ शिवमूर्ती आणि एक शिवलिंग असलेली एक अद्वितीय अशी ३६० शिवमूर्तींची पिंड आहे, जी जगातील एकमेव मानली जाते. अशी श्रद्धा आहे की, एकदा अभिषेक केल्यास वर्षभर अभिषेकाचे पुण्य लाभते. सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन कालखंडात, पूर्व दिशेने उगवणाऱ्या सूर्याच्या किरणांचा समप्रवेश होऊन ते मंदिराच्या दरवाज्यातून थेट पिंडीवर पडतात. ही रचना वास्तुशास्त्रानुसार अतिशय विलक्षण आहे.
गोकुळाष्टमीच्या दिवशी उत्खननात सापडलेली दुर्मिळ श्रीकृष्ण मूर्ती येथे असून, त्या मूर्तीसाठी इस्कॉन संस्थेची मागणी आहे. तसेच एक चेहरा व पाच शरीर असलेली आणखी एक दुर्मिळ मूर्ती येथे सापडली आहे. मंदिरात शके ९४० मधील मराठी व कानडी भाषेतील विस्तृत शिलालेख आढळतो. येथे पंचमहाभूतांवर आधारित पंचमुखी पिंड आहे, जे जीवनाच्या उत्पत्ती, स्थिती व लय यांचा सिद्धांत सांगतो.
या मंदिरात शैव-वैष्णव परंपरेचा समन्वय आहे. एकाच देवळात शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, जैन आणि बौद्ध मूर्ती सापडल्याने हे ठिकाण सर्वधर्म समभाव दर्शवते. हे मंदिर चालुक्य राजांच्या मंदिरसमूहातील असल्याने चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरी यादव आणि अक्कलकोटचे शिलाहार राजांनी येथे सेवा अर्पण केल्याचे शिलालेखांवरून स्पष्ट होते.
भारतीय स्थापत्यशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर या दोन शुभ दिशांतून मिळणारा भीमा आणि सीना नद्यांचा संगम इथे होतो, त्यामुळे हे स्थान अधिक पवित्र मानले जाते. सध्या सुरू असलेल्या विकासकामांमुळे हे प्राचीन मंदिर पुन्हा एकदा आपल्या पूर्व वैभवाकडे वाटचाल करत आहे.