गिझा पिरॅमिडखाली अद्भूत नगर...
ईजिप्त या देशात सहस्रावधी वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेले पिरॅमिडस् हे आज त्यांच्यावर केलेल्या इतक्या संशोधनानंरही गूढच आहे. आजही या पिरॅमिडसंबंधी नवी नवी माहिती समोर येत आहे. विशेषत: जगातील सर्वात प्रसिद्ध ‘गिझा पिरॅमिड’ संबंधात एका नव्या आश्चर्यकारक रहस्याचा शोध लागला आहे.
या पिरॅमिडस्च्या खाली एक पुरातन नगर आहे, असे बऱ्याच काळापासून बोलले जात आहे. इतके दिवस ही केवळ एक दंतकथा म्हणून मानली गेली. तथापि, आता संशोधकांनाही या दंतकथेत सत्य असल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे पिरॅमिडस् खाली दडलेल्या या अद्भूत पुरातन शहराचा शोध लावण्यासाठी जोमाने प्रयत्न केले जात आहेत. याच वर्षी जानेवारीपासून हाती घेण्यात आलेल्या या संशोधकार्याला प्रारंभीच्या काळातच मोठे यश मिळाल्याने संशोधकांचा उत्साह अनेक पटींनी वाढला आहे. फिनिक्स या पिरॅमिडखाली संशोधकांना काही खोल्या आणि एक राजमार्ग आढळला आहे. अद्याप उत्खननाचे कार्य एक टक्काही पूर्ण झालेले नाही. तथापि, एका मोठ्या पुरातन नगराचा सुगावा मात्र लागला आहे.
इटली आणि ब्रिटन या देशांमधील संशोधकांनी लेझर किरणांद्वारे या पिरॅमिडस्च्या तळाखालचा शोध घेतला असून या पिरॅमिडस्च्या आकाराच्या दसपट अधिक मोठे शहर पुरातन काळी या भागात होते, याचे स्पष्ट पुरावे या संशोधनातून हाती आले आहेत. तसेच, पुढच्या काळात आणखी अशी शहरे किंवा मानववस्त्या सापडण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यामुळे इजिप्तच्या संस्कृतीचा जो काळ सांगितला जातो, तो याहीपेक्षा पुरातन असल्याची शक्यता बळावली आहे. येत्या दोन-तीन वर्षांमध्ये यावर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.