For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्र्यांवरील आरोप बिनबुडाचे

11:12 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्र्यांवरील आरोप बिनबुडाचे
Advertisement

विविध संघटनांकडून भाजप विरोधात मोर्चा : मुख्यमंत्र्यांना समर्थन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : गोरगरीब, शोषित जनतेच्या कल्याणासाठी झटणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात भाजपकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. तर राज्यपाल यांनीही मुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतली आहे. ते केंद्र सरकारचे बाहुले बनून काम करत आहेत, याचा निषेध करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समर्थनार्थ विविध संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या निष्कलंक आहेत. गोरगरिबांच्या सेवेसाठी विशेष प्रयत्न करत आहेत.  जनतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर भाजपकडून नको ते आरोप केले जात आहेत.

राजकारणातून त्यांना संपविण्यासाठी भाजप व निजदकडून षड्यंत्र रचण्यात आले आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून राज्यातील नेत्यांना पाठबळ देण्यात येत आहे. राज्यातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुडा प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांविरोधात नोटीस देऊन राजकीय अस्थिरता निर्माण केली जात आहे. सिद्धरामय्या यांना पदावरून उतरविण्यासाठी ही खेळी आहे. मागासवर्गीयांचे नेतृत्व करणाऱ्या सिद्धरामय्या यांचे राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी कुटिल डाव रचण्यात आला आहे.

Advertisement

म्हैसूर नगरविकास प्राधिकाराच्या भूखंड वितरण (मुडा) प्रकरणामध्ये त्यांना गोवण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये त्यांचा सहभाग नसला तरीही त्यांच्यावर आरोप केले जात आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात 50-50 प्रमाणे भूखंड वितरणाचा कायदा करण्यात आला. त्यावेळी सिद्धरामय्या यांच्या पत्नींच्या नावे असणारी 3 एकर 26 गुंठे जमीन संपादन करून 1 एकर जमीन देण्यात आली आहे. सरकारी नियमाप्रमाणेच भाजपने ही जमीन वितरण केली आहे. यामध्ये सिद्धरामय्या यांचे कोणतेच पात्र नाही, असे असतानाही त्यांच्यावर चिखलफेक केली जात आहे. अशा प्रकारे त्यांना नको त्या प्रकरणात गुंतविण्याचा प्रयत्न राजकीय विरोधकांकडून सुरू आहे. गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या मुख्यमंत्र्यांवरील आरोप बिनबुडाचे आहेत, असा आरोप करत  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.

प्रारंभी कन्नड साहित्य भवन येथे जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौकात आंदोलन केले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी राज्यपाल हटाव अशा घोषणा देऊन भाजप व निजद विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कर्नाटक प्रदेश कुरबर संघ, बेळगाव जिल्हा शोषित समुदाय महासंघ, कर्नाटक राज्य मागासवर्गीय संघ यांच्यातर्फे मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आमदार राजू सेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, डॉ. राजेंद्र सन्नक्की, बसवराज बसगुंदी, मडप्पा तोळीन्नावर, मल्लेश चौगुले, राजशेखर तळवार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.