For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘फिक्सिंग’ चा आरोप धादांत खोटा !

06:22 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘फिक्सिंग’ चा आरोप धादांत खोटा
Advertisement

‘भारतातील निवडणूक यंत्रणा अतिशय बळकट आणि प्रामाणिक आहे. येथे लोकसभा निवडणूक सोडाच, पण नगरपालिका निवडणुकीतही कोणी ‘फिक्सिंग“ करु शकत नाही. त्यामुळे काँग्रेसने माझ्यावर केलेला निवडणूक फिक्सिंगचा आरोप धादांत खोटा तर आहेच, पण त्याहीपेक्षा तो अतिशय विनोदी आहे,“ असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला आहे. ते एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. ही मुलाखत सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निवडणूक फिक्सिंग केल्याचा आरोप केला होता. या आरोपाला त्यांनी परखड प्रत्युत्तर या मुलाखतीत दिले. ईडी आणि सीबीआय यांचे साहाय्य घेऊन भारतीय जनता पक्ष ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे, असाही आरोप विरोधक करीत आहेत. त्यासंबंधीही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 2014 मध्ये ईडी आणि सीबीआयसह सर्व केंद्रीय यंत्रणा काँग्रेसच्या हाती होत्या. तरी काँग्रेस का जिंकू शकली नाही, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. ईडी आणि सीबीआयमुळे कोणी निवडणूक जिंकत नसते, हे यावरुन सिद्ध होते, अशी टिप्पणी त्यांनी केली.

मोठ्या देशात हे अशक्यच...

Advertisement

भारत 140 कोटी लोकांचा मोठा देश आहे. अशा देशात अगदी निम्न स्तरावरील निवडणूक फिक्स करणेही अशक्य आहे. मोठ्या निवडणुकांचा तर विचारही करण्याचे कारण नाही. काँग्रेसने आमच्यावर असा आरोप करण्यापेक्षा स्वत:च एखादी निवडणूक ‘फिक्स“ करण्याचा प्रयत्न करुन बघावा. म्हणजे त्यांना सत्य कळून येईल, अशा कानपिचक्याही त्यांनी काँग्रेसला दिल्या आहेत. विरोधक केवळ नैराश्यापोटी असे आरोप करीत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

विरोधकांचा मोठा अपेक्षाभंग...

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे पार पडले आहेत. विरोधकांना या दोन टप्प्यांमध्येच त्यांचे भवितव्य कळून चुकले आहे. त्यामुळे ते इतके उदास झालेले आहेत, की त्यांनी आता पळवाटा शोधण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. म्हणून फिक्सिंगचे आरोप केले जात आहेत. निवडणुकीत विरोधकांचा पराभव झाल्यानंतरही त्यांना लोकांसमोर पराभवाची कारणे स्पष्ट करावी लागणारच आहेत. त्यामुळे आतापासूनच त्यांनी ही कारणे तयार ठेवण्याचा प्रयत्न चालविलेला आहे, अशी खिल्ली त्यांनी उडविली.

Advertisement
Tags :

.