इंडस टॉवर्सच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन जैसे थे
बेळगाव : इंडस टॉवर्स अंतर्गत काम करणारे शेकडो कामगार व भारतीय खासगी दूरसंचार मजूर संघाच्या (बीपीटीएमएस) पदाधिकाऱ्यांवर नव्या कंत्रादाराकडून अन्यया करण्यात येत आहे. त्यांनी पद्भार स्वीकारल्यानंतर अनेक कामगारांना कामावरून बडतर्फ केले आहे. यामुळे सदर कामगार व संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले आहे. गुरुवारीही सदर आंदोलन जैसे थे ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र तोडगा निघाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
नवीन कंत्राटदाराने काढून टाकलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे. आठवड्यातील सुटीचा दिवस, राष्ट्रीय व सणांच्या सुट्या देण्यात याव्यात. 8 तासांच्या कामाची मर्यादा ठेवावी. ओव्हरटाईमचे योग्य वेतन देण्यात यावेत. वेतनात सुधारणा करून वेतनप्रणाली लागू करावी. सर्व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय व अपघात विमा प्रदान करावा. कर्तव्यावर मृत्यू झाल्यास मृत कुटुंबाला 25 लाख रुपयांची भरपाई द्यावी. कर्मचाऱ्यांना संरक्षक कीट पुरवावे. इंडस टॉव्हर्सच्या कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या मान्य करण्याची मागणीही करण्यात आली आहे.