For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द. आफ्रिका-विंडीज पहिली कसोटी अनिर्णीत

06:25 AM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
द  आफ्रिका विंडीज पहिली कसोटी अनिर्णीत
Advertisement

केशव महाराज ‘सामनावीर’, अॅथनेझचे शतक हुकले

Advertisement

वृत्तसंस्था/पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनीदाद)

यजमान विंडीज आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिली क्रिकेट कसोटी पाचवया आणि शेवटच्या दिवशी अनिर्णीत अवस्थेत संपली. उभय संघात दोन सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली जात आहे. या सामन्यात द. आफ्रिकेच्या केशव महाराजला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेने पहिल्या डाव्यात 357 धावा जमविल्यानंतर विंडीजचा पहिला डाव 233 धावांत आटोपला. द. आफ्रिकेने 124 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर द. आफ्रिकेने आपला दुसरा डाव 3 बाद 173 धावांवर घोषित करुन खेळाच्या शेवटच्या दिवशी विंडीजला निर्णायक विजयासाठी 298 धावांचे आव्हान दिले. मात्र विंडीजने दुसऱ्या डावात 5 बाद 201 धावांपर्यंत मजल मारल्याने हा सामना अनिर्णीत राहिला. उभय संघातील दुसरी आणि शेवटची कसोटी गयाना येथे येत्या गुरूवारपासून खेळविली जाणार आहे. या मालिकेनंतर उभय संघात 3 सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे.

या पहिल्या कसोटीत पावसामुळे बराच खेळ वाया गेला. पहिल्या दिवशी केवळ 15 षटकांचा खेळ झाला. रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी द. आफ्रिकेने बिनबाद 30 या धावसंख्येवरुन दुसऱ्या डावाला पुढे सुरूवात केली आणि त्यांनी 29 षटकात 3 बाद 173 धावांवर डावाची घोषणा केली. द. आफ्रिकेच्या स्टब्जने 50 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 68 धावा जमविल्या. सलामीच्या झोर्जीने 60 चेंडूत 4 चौकारांसह 45, मार्करमने 48 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 38 धावा जमविल्या. रॉचने स्टब्जचा त्रिफळा उडविल्यानंतर द. आफ्रिकेने आपल्या डावाची घोषणा केली. विंडीजतर्फे वेरीकेनने 2 तर रॉचने 1 गडी बाद केला. उपाहारापर्यंत विंडीजने 1 बाद 11 धावा जमविल्या होत्या.

खेळाच्या दुसऱ्या सत्राला उशीरा सुरूवात झाली. विंडीजच्या अॅथनेझने 116 चेंडूत 9 चौकारांसह 92 तर हॉजने 55 चेंडूत 4 चौकारांसह 29, कार्टीने 54 चेंडूत 4 चौकारांसह 31, होल्डरने 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 31 धावा जमविल्या. शेवटच्या दिवसाअखेर 56.2 षटकात विंडीजने दुसऱ्या डावात 5 बाद 201 धावांपर्यंत मजल मारली. द. आफ्रिकेच्या केशव महाराजने कर्णधार ब्रेथवेटला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. रबाडाने लुईसला 9 धावावर बाद केले. अथांजे आणि कार्टी यांनी तिसऱ्या गड्यासाठी 46 धावांची भर घातली. कार्टी बाद झाल्यानंतर हॉज आणि अथांजे यांनी चौथ्या गड्यासाठी 63 धावांची भागिदारी केली. अथांजेने होल्डर समवेत पाचव्या गड्यासाठी 65 धावांची भागिदारी केली. केशव महाराजने अथांजेला झेलबाद केले. त्याचे शतक 8 धावांनी हुकले. द. आफ्रिकेतर्फे केशव महाराजने 88 धावांत 4 तर रबाडाने 1 गडी बाद केला. या सामन्यात केशव महाराजने 164 धावांत 8 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक: द. आफ्रिका प. डाव 117.4 षटकात सर्व बाद 357, विंडीज प. डाव 91.5 षटकात सर्व बाद 233, द. आफ्रिका दु. डाव 29 षटकात 3 बाद 173 डाव घोषित (झोर्जी 45, मार्करम 38, स्टब्ज 68, बहुमा नाबाद 15, वेरीकेन 2-57, रॉच 1-39), विंडीज दु. डाव 56.2 षटकात 5 बाद 201 (अॅथनेझ 92, कार्टी 31, हॉज 29, होल्डर नाबाद 31, अवांतर 7, केशव महाराज 4-88, रबाडा 1-38).

Advertisement
Tags :

.