द. आफ्रिकेची विंडीजवर 154 धावांची आघाडी
वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन
सध्या दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ विंडीजच्या दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील येथे सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेने यजमान विंडीजवर 154 धावांची भक्कम आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. या सामन्यात पावसाचा वारंवार अडथळा आल्याने बराच खेळ वाया गेला.
या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 357 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजचा पहिला डाव 91.5 षटकात 233 धावांवर आटोपला. खेळाच्या चौथ्या दिवशी विंडीजने 4 बाद 154 या धावसंख्येवरुन आपल्या पहिल्या डावाला पुढे सुरुवात केली. आणि त्यांचे उर्वरित 6 गडी 79 धावांत बाद झाले. विंडीजच्या पहिल्या डावात कर्णधार ब्रेथवेटने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 35, लुईसने 5 चौकारांसह 35 कार्टीने 5 चौकारांसह 42 हॉजने 1 चौकारासह 25, होल्डरने 4 चौकारांसह 36 तर वेरिकेनने 32 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 35 धावा जमविल्याने विंडीजला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. दक्षिण आफ्रिकेतर्फे किसन महाराजने 76 धावांत 4 तर रबाडाने 56 धावांत 3 तर एन्गिडी आणि मार्व्रम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेने विंडीजवर पहिल्या डावात 124 धावांची आघाडी मिळविली. दक्षिण आफ्रिकेने दिवस अखेर दुसऱ्या डावात बिनबाद 30 धावा जमवून विंडीजवर एकूण 154 धावांची बढत मिळविली. दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात विजयाची निश्चितच संधी आहे. पण पावसाचा अडथळा आल्यास हा सामना अनिर्णित राहिल.
संक्षिप्त धावफलक - दक्षिण आफ्रिका प. डाव सर्व बाद 357, विंडीज प. डाव 91.5 षटकात सर्व बाद 233 (ब्रेथवेट 35, लेव्हिस 35, कार्टी 42, हॉज 25, होल्डर 36, वेरिकेन नाबाद 35, केशव महाराज 4-76, रबाडा 3-56, एन्गिडी व मार्करम प्रत्येकी 1 बळी), दक्षिण आफ्रिका दु. डाव 5 षटकात बिनबाद 30.