For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2030 चे राष्ट्रकुल खेळ रंगणार अहमदाबाद शहरात

06:58 AM Nov 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
2030 चे राष्ट्रकुल खेळ रंगणार अहमदाबाद शहरात
Advertisement

शताब्दी वर्षात आयेजनाचा मान, 2010 नंतर खेळांचे भारतात पुनरागमन, कॉमनवेल्थ स्पोर्टच्या सर्वसाधारण सभेत मोहोर

Advertisement

वृत्तसंस्था/ ग्लासगो

कॉमनवेल्थ स्पोर्ट्सच्या बुधवारी येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत भारतीय शहर अहमदाबादला 2030 च्या राष्ट्रकुल खेळांच्या यजमानपदाचे अधिकार देण्यात आले. यामुळे दोन दशकांनंतर सदर बहुक्रीडा स्पर्धेच्या देशात पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या महिन्यात कॉमनवेल्थ स्पोर्ट्सच्या कार्यकारी मंडळाने शताब्दी वर्षातील आवृत्तीच्या यजमानपदासाठीं अहमदाबादची शिफारस केल्यानंतर 74 सदस्यांच्या सर्वसाधारण सभेने भारताच्या दाव्यावर मंजुरीची मोहोर उमटवणे ही केवळ औपचारिकता होती.

Advertisement

भारताने शेवटच्या खेपेला 2010 मध्ये दिल्ली येथे राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले होते. कार्यकारी मंडळाच्या शिफारसीनंतर कॉमनवेल्थ स्पोर्ट्सच्या मूल्यांकन समितीच्या देखरेखीखाली राबविण्यात आलेली प्रक्रिया पार पडली. ‘भारतासह भव्यपणा, तऊणाई, महत्त्वाकांक्षा, समृद्ध संस्कृती, प्रचंड क्रीडा आवड आणि प्रासंगिकता येते. आम्ही राष्ट्रकुल खेळांचे पुढील शतक चांगल्या पद्धतीने सुरू करत आहोत’, असे कॉमनवेल्थ स्पोर्ट्सचें अध्यक्ष डॉ. डोनाल्ड ऊकारे म्हणाले. या निर्णयामुळे 2036 मध्ये ऑलिंपिकचे यजमानपद भूषविण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला बळकटी मिळाली आहे. ऑलिंपिक यजमानपदाच्या हक्काच्या शर्यतीत असलेल्या अहमदाबाद शहराने गेल्या एक दशकात युद्धपातळीवर आपल्या क्रीडा पायाभूत साधनसुविधांमध्ये सुधारणा केली आहे.

2030 च्या राष्ट्रकुल खेळांच्या यजमानपदावरील दाव्याच्या बाबतीत भारताला नायजेरियन शहर अबुजाकडे स्पर्धा करावी लागली होती. परंतु कॉमनवेल्थ स्पोर्टने 2034 च्या आवृत्तीसाठी सदर आफ्रिकन राष्ट्राचा विचार करण्याचा निर्णय घेतला. 2010 च्या दिल्ली गेम्ससाठी भारताने जवळजवळ 70 हजार कोटी ऊपये खर्च केले होते आणि ते 1600 कोटी ऊपयांच्या सुऊवातीच्या अंदाजापेक्षा खूपच जास्त होते.

कॉमनवेल्थ स्पोर्टने दाखवलेल्या विश्वासाचा आम्ही खूप आदर करतो. 2030 चे खेळ केवळ राष्ट्रकुल चळवळीची 100 वर्षे साजरी करणार नाहीत, तर पुढील शतकाचा पायाही रचतील. हे खेळ मैत्री आणि प्रगतीच्या भावनेने संपूर्ण राष्ट्रकुलमधील खेळाडूंना आणि संस्कृतींना एकत्र आणतील, असे कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा म्हणाल्या,

15-17 खेळांचा असेल समावेश

कॉमनवेल्थ स्पोर्टने पुष्टी केली आहे की, 2030 च्या खेळांमध्ये 15 ते 17 खेळांचा समावेश असेल. ‘अमदावाद 2030 टीम ही कॉमनवेल्थ स्पोर्ट आणि आंतरराष्ट्रीय महासंघांच्या समुदायासोबत जवळून काम करेल, जेणेकरून स्थानिक साज असलेला आणि जागतिक स्तरावर आकर्षित करून घेणारा एक गतिमान आणि रोमांचक क्रीडा कार्यक्रम आकारास येईल, असे संस्थेने म्हटले आहे. अॅथलेटिक्स आणि पॅरा अॅथलेटिक्स, जलतरण आणि पॅरा स्विमिंग, टेबल टेनिस आणि पॅरा टेबल टेनिस, बाउल्स आणि पॅरा बाउल्स, वेटलिफ्टिंग आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, नेटबॉल आणि बॉक्सिंग हे त्यात झळकणार असलेले नि]िश्चत क्रीडाप्रकार आहेत.

उर्वरित क्रीडाप्रकार निश्चित करण्याची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होईल आणि शताब्दी वर्षातील खेळांत समावेश असलेल्या सर्व क्रीडाप्रकारांची यादी पुढील वर्षी जाहीर केली जाईल. ‘विचाराधीन खेळांमध्ये तिरंदाजी, बॅडमिंटन, 3×3 बास्केटबॉल आणि 3×3 व्हीलचेअर बास्केटबॉल, बीच व्हॉलीबॉल, क्रिकेट टी-20, सायकलिंग. डायव्हिंग, हॉकी, ज्युदो, रिदमिक जिम्नॅस्टिक्स, रग्बी सेव्हन्स, नेमबाजी, स्क्वॅश, ट्रायथलॉन व पॅरा ट्रायथलॉन आणि कुस्ती यांचा समावेश आहे. यजमान दोन नवीन किंवा पारंपरिक खेळ देखील प्रस्तावित करू शकतात’, असे संस्थेकडून नमूद करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.