म्हणूनच विरोधकांना पैशांचा पाऊस पाडावा लागतोय
ठाकरे शिवसेनेची टीका
सावंतवाडी : प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवार हे सक्षम आणि जनतेचे हित पाहणारे आहेत. आमचे उमेदवार तगडे असल्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला निवडणुकीत पैशाचा वापर करावा लागत आहे. मात्र, जनता उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना विजयी करेल, असा विश्वास उद्धव ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
चार वर्षांपूर्वी संजू परब यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर जिल्ह्यातील सर्वात मोठे लँडमाफिया असल्याचा केलेला आरोप केसरकर विसरलेत का, असा थेट सवाल करत केसरकर यांनी कोड्यात न बोलता लँडमाफिया नेमके कोण आहेत, याची नावे जाहीर करावीत, असे आव्हान राऊळ यांनी दीपक केसरकर आणि सत्ताधाऱ्यांना दिले आहे.
राऊळ यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हा हल्लाबोल केला. यावेळी शहर संघटक निशांत तोरसकर उपस्थित होते. जे नितेश राणे निवडणुकीपूर्वी विशाल परब यांच्या विरोधात बोलत होते, ते आता दीपक केसरकर यांच्या विरोधात बोलत आहेत. रंग बदलण्याची त्यांची जुनी सवय आहे. परंतु येथील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे काही झाले तरी ते ठाकरे शिवसेनेच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास राऊळ यांनी यावेळी व्यक्त केला.
राऊळ पुढे म्हणाले, "या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा बाजार मांडला जात आहे. सत्ताधारी विकासाच्या मुद्द्यावर जनतेमध्ये जायला हवे होते. पण राजघराणे आणि लँडमाफिया अशा विषयांवर बोलून विकासाचे मुद्दे बाजूला पडले आहेत. हिंमत असेल तर विकासाच्या मुद्द्यावर लोकांना सामोरे जा, असे आव्हान त्यांनी दिले.केसरकर आणि भाजपकडे यापूर्वी सत्ता होती, पण त्यांनी तलावावर दिवे लावण्यापलीकडे काहीच केले नाही. विकास कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून तेच पैसे आता ते निवडणुकीत वाटत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
राऊळ यांनी आपल्या उमेदवारांचे समर्थन करताना सांगितले की, आमचे सर्व उमेदवार चारित्र्यवान आहेत. त्यामुळेच सत्ताधारी आम्हाला उत्तर देऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पुन्हा निवडून आल्यावर तेच प्रकार पुन्हा होणार आहे. त्यामुळे आमच्या उमेदवारांच्या पाठिशी येथील जनतेने ठामपणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.केसरकर भाजपवासी होणार हे मी पहिलेच सांगितले होते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी वारंवार सांगण्यापेक्षा केसरकर कधी येणार, हे जाहीर करून टाकावे, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.