त्यासि अंकुशाचा मार
लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा
ऐरावती रत्न थोर
त्यासी अंकुशाचा मार
यातल्या ‘लहानपण देगा देवा’ ह्या ओळी किती जरी गोड वाटत असल्या तरी ते लहानपण आपल्याकडे काही कायमचं स्टोअर करता येत नाही ही सत्य गोष्ट आहे. कधी ना कधीतरी ते लहानपण संपतं. आणि मग मार खाण्यासाठी आपण ऐरावत रत्न थोर होण्याची काहीच गरज नसते. मोठेपण हे आपल्याबरोबर येतानाच अनेक प्रकारचे मार घेऊन येत असतं. आणि एकसारखं आपला गंडस्थळ फोडतच असतं. त्याकरता ऐरावत होण्याची खरोखरच काही गरज नसते हे कोणालाही पटेल. आणि ही चिकित्सा करायची म्हणून मी करत नाहीये. पण एक विचार करून बघावा की ‘मुंगी साखरेचा रवा’ हे म्हणायला जितकं गोड वाटतं तितकं ते गोड नसतं. मुंगी हे फक्त त्या वेळेला तुकाराम महाराजांनी दृष्टांत देण्याकरता वापरलेलं उदाहरण आहे. तेसुद्धा कशासाठी? त्यातून त्यांना काय सांगायचं होतं? ही गोष्ट पण निराळी असते. त्यांना एवढं म्हणायचं होतं की माणसाने स्वत:कडे गरज पडल्यास धाकुटेपण घ्यावं पण आपलं कार्य पूर्णत्वाला न्यावं. अज्ञानी असणं, बालकवृत्ती धरून असणं हे कधीही माणसासाठी फायदेशीर असतं. अर्थात ती कुठे आणि कोणत्या जागी धरायची याला मात्र काही नियम किंवा काही शिस्त असते. परंतु बालकवृत्ती अंगी बाणावी ते काही शिकायचं असेल त्यावेळी. ही बालकवृत्ती माणसात जितके दिवस शिल्लक असेल जितकी वर्षं शिल्लक असेल तितकी वर्षं त्याचं शिकणं संपत नाही. आणि ज्ञान हे साठवाल तितकं तुम्हाला उपयोगी पडतच असतं. अशा सगळ्या संदर्भाने तुकाराम महाराजांनी मोठे विचार या ओळीत लिहिलेले आहेत पण याचा शब्दश: अर्थ जर माणूस घ्यायला गेला तर तो फारच कठीण मामला होऊन बसेल. कारण मुंगीला साखरेचा रवा जरी मिळत असला तरी आजकाल मुंग्यांना सुद्धा साखर मिळवणं तितकं सोयीचं, सोपं राहिलेलं नाहीये. अजागळ गृहिणीच्या स्वयंपाकघरातून साखरेचा रवा पळवून नेणं सोपं असलं तरी हल्ली महिन्याच्या महिन्याला, वर्षाच्या वर्षाला पेस्ट कंट्रोल करून घेणाऱ्या कर्तव्यतत्पर लोकांच्या स्वयंपाकघरात जाऊन कुठला मिळणारे साखरेचा रवा? आधुनिक मुंग्यांचं दु:ख सुद्धा असं आधुनिक आणि औषधी आहे. शिवाय या ओळीत अजून एक विरोधाभास असा आहे की मुंगी हा कीटक म्हणजेच प्राणी आकाराने फक्त लहान असतो. आकाराने लहान असलेले सर्व प्राणी हे वयाने लहान असतात, असं गृहीत धरता येत नाही. त्यामुळे मुंगी फक्त आकाराने लहान असते त्या आकारामुळे ती सुटसुटीत होते आणि कुठेही फिरू शकते एवढाच त्याचा मर्यादित अर्थ आहे. त्या मुंग्यांना सुद्धा मोठेपण येत असतं की! आणि मोठेपण आलेल्या मुंग्यांना आपलं आयुष्य त्या साखरेचे कण वेचून वेचून, वेचून वेचूनच घालवावं लागतं. त्यांच्या लहान मुंग्या काय खेळत असतील हे त्या मुंग्या जाणोत आणि परमेश्वर जाणे. शिवाय हत्ती या प्राण्याच्या जाणिवा आणि मुंगी या प्राण्याला असणाऱ्या जाणिवा यातसुद्धा प्रचंड फरक असतोच ना? संत साहित्याबद्दल अनादर दाखवण्याचा हेतू यात अजिबातच नाही. कारण संत हे कधीही वंदनीय आणि पूज्य होते. परंतु हे साहित्य आहे त्याप्रमाणेच ती एक कविताही आहे. आणि एका कवितेचे अनेक अर्थ असतात शिवाय चांगली कविता, चांगलं पद हे कोणत्याही माणसाला विचारप्रवण करतंच करतं.
या नियमाला जर धरलं तर या एका कवितेतून अनेक अर्थ बाहेर यायला लागतात. आणि अर्थांच्या त्या विविध पातळ्यांच्या विरोधाभासाची मोठी गंमत वाटते. वरपांगी असणारी विरोधाभासी विधानं अंतरंगातून एक संपूर्ण आकृती दाखवणारी असू शकतात. ती एकमेकाला पूरक असू शकतात. असं या कविता वाचताना लक्षात येत जातं. सर्वसामान्य माणसांना समजावं म्हणून तुकोबारायांनी आकाराने लहान-मोठे असणाऱ्या प्राण्यांचे दृष्टांत दिले आहेत परंतु शेवटी त्यांना यातून जे काय सांगायचं आहे ते म्हणजे
जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण
हे त्याचं सारसर्वस्व आहे असं म्हणावं लागेल. म्हणजेच हे मोठेपण एकदा का माणसाला आलं की ते स्वत: बरोबर अनंत यातना घेऊन येतं. त्या यातना अनेक प्रकारच्या असतात. ज्या एकदा सुरू होतात त्यांना संपण्यासाठीच म्हणून की काही यास तुकोबारायाने ‘सुख पाहता जवापाडे दु:ख पर्वताएवढे’ हे म्हणून ठेवलंय. सुख म्हणजे काय आणि दु:ख म्हणजे काय हे लहान मुलांना कळतच नसतं. त्यांच्या लेखी त्यांना हवं ते मिळालं, खायला मिळालं, आई मिळाली की सुख आणि बाकीचं काय ते असेल ते दु:ख. पण याची त्यांच्याकडे निश्चित व्याख्याही नसते आणि आलेले अनुभवही नसतात. पण मोठ्या माणसांना मात्र असंख्य प्रकारच्या अडचणींचा सामना करून रोजचं आयुष्य जगायचं असतं. असंख्य ताप, ताण असतात. अचानक येणारी संकटं असतात. नातेसंबंधांमुळे येणारी न संपणारी दु:खं असतात. हे सगळं न संपणारं असतं. घरात सुद्धा जो कर्ता पुरुष असतो त्याला सगळ्या कुटुंबाच्या यातना स्वत:च्या अंगावर वागवत फिरावं लागतं. आणि दुखतं आहे असं म्हणायची मात्र सोय ठेवलेली नसते. अशा इतक्या कठीण यातना मोठेपणाचा दागिना म्हणून अंगावर येतात. तुकोबारायांना ज्या वयात विरक्ती आली ते तत्कालीन मोठेपणाचंच वय होतं. आपली पत्नी आणि आपला मुलगा त्यांनी दुष्काळात आणि महामारीत गमावला होता. त्यांच्या अंगी एकाएकी आलेलं मोठेपण त्यांना काय कठीण यातना देऊन गेलं असेल! कदाचित तोच अनुभव कळवळून त्यांच्या लेखणीतून बाहेर पडला आणि या ओळी जन्माला आल्या असाव्यात.
जगाच्या व्यवहारात चालताना अनेक प्रकारच्या यातना होत राहणार आणि त्या यातना सहन करत त्यांच्याहून मोठं जाणं हेच मोठ्या माणसाचं लक्षण समजण्याची आपल्याकडे रीत आहे. आणि ती इतकी पक्की आहे की सातशे वर्षांपूर्वी महाज्ञानी संतकवी म्हणून जन्माला आलेल्या ज्ञानेश्वरांनाही त्यांच्यापेक्षाही लहान बहिणीने केलेल्या उपदेशात
जग झालीया वन्ही संती सुखे व्हावे पाणी
विश्व पट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा
याप्रमाणे उद्गार काढले होते. ज्यांना माऊली म्हणतात म्हणजे सर्वांसाठी ज्यांच्या हृदयात फक्त क्षमा आहे त्या ज्ञानेश्वरांनाही समाजाची चीड यावी, उद्वेग व्हावा असे प्रसंग त्यांच्या इवल्याशा आयुष्यात आले होते. ज्याचा उपाय इतके मोठे संत आणि योगी असूनही त्यावेळी त्यांनाही सुचला नाही आणि तो उपाय दुसऱ्याने सांगावा लागला. तर संसारी असणाऱ्या आपल्यासारख्या सामान्य माणसाला आपल्या यातना, दु:खं, यातून बाहेर पडण्यासाठी दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यावीच लागते. कारण हा मार प्रत्येकवेळेला उघड असतो असं नाही. प्रकट असतो असंही नाही. आतल्या आत कुढत राहण्याची वेळ ज्यावेळी येते त्यावेळेला दुसऱ्याची मदत घेऊनच आपल्याला या सगळ्या परिस्थितीवर मात करावी लागते. कारण स्वत:च्या भावभावनांचे स्वत: यशस्वी व्यवस्थापन करणे हा तितका सोपा मार्ग खचितच नाही. स्वत:च्या भावनांचं उत्तम व्यवस्थापन करता आलं तर माणूस स्वत:च्या मनुष्यजन्माचं कल्याण करून घ्यायला शिकणार नाही का? तितकं मोठं होण्यासाठी परिस्थितीचे, दु:खांचे, सगळ्याच गोष्टींचे अंकुश वारंवार झेलावे लागतात. त्या ‘यातना कठीण’ पार करून गेलं की मग ‘तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लडिवाळे’ इतकी अवस्थेप्रत माणूस पोहोचतो. पण तोपर्यंत तरी त्यासि अंकुशाचा मार हेच खरं...
-अॅड. अपर्णा परांजपे प्रभु