‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज
बेंगळूर : बेळगावमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी धारवाडचे एएसपी नारायण भरमणी यांना व्यासपीठावर बोलावून हात उगारला होता. यामुळे नाराज झालेल्या नारायण भरमणी यांनी स्वेछानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यांनी दोन पानांचे पत्र सरकारला पाठविले आहे. दरम्यान, त्यांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. बेळगावमध्ये काँग्रेसच्या एका सभेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे भाषण सुरू असताना भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून गोंधळ घातला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या सिद्धरामय्यांनी तेथे ड्युटीवर असलेल्या नारायण भरमणी यांना व्यासपीठावर बोलावून हात उगारला होता. यावरून सिद्धरामय्यांवर टिकाही झाली होती. परंतु, या अनपेक्षित घटनेमुळे नाराज झालेल्या भरमणी यांनी स्वेछानिवृतीसाठी अर्ज केला आहे.
स्वेच्छानिवृत्ती अर्ज स्वीकारणार नाही : परमेश्वर
धारवाडचे एएसपी नारायण भरमणी यांच्या स्वेच्छानिवृत्ती अर्जाबद्दल प्रतिक्रिया देताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी, एएसपी नारायण भरमणी यांची स्वेछानिवृत्ती स्वीकारली जाणार नाही. त्यांना पुन्हा पोस्टींग दिली जाईल. भरमणी यांच्याशी मी व मंत्री एच. के. पाटील यांनी चर्चा केली आहे, असे सांगितले.