Karad News : महिलेशी गैरवर्तन करणारा 'तो' डॉक्टर बोगस !
कराडमध्ये बोगस डॉक्टरवर लैंगिक छळाचा संशय
कराड : कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या लैंगिक छळ प्रकरणाच्या तपासादरम्यान विमानतळाजवळील मुंढे परिसरातील शाहिन क्लिनिक चालवणारा डॉक्टर बोगस असल्याचे उघडकीस आले आहे.
डॉक्टर असल्याची कोणतीही कागदपत्रे संशयित अल्ताफ नदाफ याच्याकडे आढळली नसून याबाबत पोलिसांकडून कायदेशीर प्रकिया सुरू आहे. पीडितेकडून मिळालेल्या फिर्यादीनुसार उपचारासाठी गेल्यावर संशयित नदाफ यांनी तिच्याशी गैरवर्तन केल्याची नोंद आहे.
या प्रकरणानंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक पंचनाम्यातक्लिनिकमध्ये डॉक्टर असल्याचे दाखवणारी कोणतीही प्रमाणपत्रे किंवा नोंदणी क्रमांक आढळले नाहीत. त्यामुळे क्लिनिकमधील वैद्यकीय कामकाजाबाबत संशय अधिक गडद झाला. तपासाचा पुढील टप्पा म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित ठिगळे, आरोग्य कर्मचारी, पोलिसांनी२७ नोव्हेंबर रोजी शाहिन क्लिनिकची अचानक तपासणी केली.
क्लिनिकच्या बाहेर किंवा आत वैद्यकीय पदवी दर्शवणारा फलक स्पष्ट दिसत नव्हता. आतील फलक आणि दाखवलेली कागदपत्रे एकमेकांशी जुळत नसल्याचेही तपासात समोर आले.तपासणीदरम्यान क्लिनिकमध्ये इंजेक्शन्स, सलाईन बॉटल, शस्त्रक्रिया साहित्य, औषधे, सलाईन सेटसह उपचारासाठी वापरली जाणारी सामग्री आढळली. ही सामग्री अॅलोपॅथी उपचारांसाठी असली तरी संशयिताकडे त्यासाठी आवश्यक परवाना किंवा अधिकृत नोंदणी नसल्याचे निदर्शनास आले. संशयित नदाफ यांची मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी नसल्याचे स्पष्ट झाले.
तरीही ते क्लिनिकमध्येस्वतःला डॉक्टर म्हणून दाखवत उपचार सुरू असल्याचे समोर आले. क्लिनिकमधील सापडलेल्या साहित्याचा तपशीलवार पंचनामा
करून ते पोलिसांच्या ताब्यात दिले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित ठिगळे यांनी सांगितले की, परवाना किंवा शैक्षणिक पात्रतेशिवाय उपचार करणे ही गंभीर फसवणूक आहे. रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण करणारी बाब आहे. या तपासाचा अहवाल पोलिसांकडे सुपूर्द केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून क्लिनिकच्या कागदपत्रांची अधिक तपासणी केली जात आहे.