टेंगिनकेरा गल्लीतील ‘त्या’ बाकड्याचा अखेर शोध
बेळगाव : टेंगिनकेरा गल्ली क्रॉस येथील होळी कामाण्णा मंदिराच्या आवारातून बाकड्याची चोरी झाल्याप्रकरणी शनिवार दि. 22 रोजीच्या अंकात ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी बाकड्याचा शोध घेऊन तो पुन्हा मंदिर आवारात ठेवला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. खडेबाजार रोडवरील टेंगिनकेरा गल्ली क्रॉसवरील होळी कामाण्णा मंदिराच्या आजूबाजूला केरकचरा टाकण्यासह मांसाहारी व शाकाहारी हॉटेल्समधील खरकटे टाकले जात होते. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आल्याने त्याला स्थानिक रहिवाशांनी व व्यापाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे महानगरपालिकेच्यावतीने काही महिन्यांपूर्वी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना बसण्यासाठी बाकडे व शोभेची झाडे लावली होती. मात्र त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले बाकड गायब झाल्याने हा चर्चेचा विषय बनला होता. याबाबत ‘तरुण भारत’मधून वृत्त प्रसिद्ध होताच मनपाने ही बाब गांभीर्याने घेतली. काही जणांनी सदर बाकड तेथून उचलून नेऊन दुसरीकडे ठेवले होते. त्यामुळे मनपाच्या सफाई कामगारांनी बाकडाचा शोध घेऊन ते पुन्हा आहे तिथे ठेवले आहे.