‘सावरकर पुरस्कारा’स थरुर यांचा नकार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘वीर सावरकर पुरस्कार’ स्वीकारण्यास काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी नकार दिला आहे. ‘हायरेंज रुरल डेव्हलपमेंट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेने 2025 या वर्षासाठी हा पुरस्कार त्यांना देण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, आपल्याला हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती वृत्तपत्रांमधूनच समजली, असे स्पष्ट करत, आपण हा पुरस्कार स्वीकारणार नाही, असे थरुर यांनी घोषित केले आहे.
बुधवारी या पुरस्कारचे वितरण त्यांना नवी दिल्ली येथे केले जाणार होते. तथापि, हा पुरस्कार आपण स्वीकारणार की नाही, अशी विचारणा संस्थेने आपल्याकडे केले नव्हती. आपली अनुमती न घेताच ते आपल्याला देण्याचे घोषित करण्यात आले. मी तो नाकारला असून त्याच्या सभारंभालाही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेकडून प्रतिवाद
हा पुरस्कार त्यांना घोषित करण्यात आला आहे, याची पूर्ण माहिती थरुर यांना बऱ्याच आधी देण्यात आली होती, असे स्पष्टीकरण या संस्थेने दिले आहे. आमच्या संस्थेचे काही प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी शशी थरुर यांच्या निवासस्थानी गेले होते. निवासस्थानी खासदार थरुर यांची भेट घेऊन त्यांना या पुरस्काराची आणि तो त्यांना घोषित करण्यात आल्याची सर्व माहिती त्यांना देण्यात आली होती. हा पुरस्कार अन्य कोणाला देण्यात आला आहे, याची सूची मला देण्यात यावी, अशी सूचना त्यावेळी थरुर यांनी केली होती. ती माहितीही त्यांना देण्यात आली होती, असा प्रतिवाद या संस्थेचे सचिव आजी कृष्णन यांनी केला आहे.