काँग्रेसच्या बैठकीला थरुर अनुपस्थित
तीन आठवड्यांमध्ये तिसऱ्यांदा घडला असा प्रकार
वृत्तसंस्था
केरळमधील काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या काँग्रेस खासदारांच्या बैठकीला दांडी मारली आहे. शुक्रवारी सकाळी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस खासदारांच्या बैठकीला थरुर यांनी अनुपस्थित राहणे हा प्रकार गेल्या तीन आठवड्यांमध्ये तिसऱ्यांना घडला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेला तोंड फुटले आहे.
काँग्रेस खासदारांची बैठक राहुल गांधी यांनी विशिष्ट उद्देशाने आयोजित केली होती, असे बोलले जाते. संसदेचे शीतकालीन अधिवेशन 19 डिसेंबरला समाप्त होत आहे. आता अधिवेशनाचा केवळ एक आठवडा उरला आहे. या कालावधीत काँग्रेस खासदारांनी केंद्र सरकारच्या विरोधात आपला आवाज अधिक धारदार करावा, अशी सूचना गांधी करणार होते. म्हणून बैठक आयोजित केली होती. तथापि, थरुर यांनी या बैठकीला अनुपस्थित राहून कोणता संदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींना दिला आहे, यासंबंधी बरेच तर्कवितर्क केले जाऊ लागले आहेत.
सोनिया गांधी यांचीही अनुज्ञा
30 नोव्हेंबरला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी खासदारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीलाही शशी थरुर अनुपस्थित राहिले होते. 2020 मध्ये काँग्रेसच्या ज्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेसंबंधात जाहीररित्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, त्या नेत्यांमध्ये शशी थरुर यांचाही समावेश होता. त्यामुळे तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीला त्यांच्या या कृतीशी जोडून पाहिले गेले होते. मात्र, आपल्या केरळहून येणाऱ्या विमानाला उशीर झाल्याने आपण बैठकीला वेळेत उपस्थित राहू शकलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
पंतप्रधान मोदी यांच्याशी जवळीक
गेल्या काही महिन्यांपासून शशी थरुर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक साधू पहात आहेत, अशी चर्चा आहे. त्यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे आणि निर्णयक्षमतेचे जाहीर कौतुक गेले आहे. त्यांची ही कृती काँग्रेसच्या नेतृत्वाला रुचलेली नाही, हे सुद्धा दिसून आलेले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रपती भवनात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना देण्यात आलेल्या शाही भोजनाच्या कार्यक्रमालाही उपस्थिती दर्शविली होती. केंद सरकारच्या रशियासंबंधीच्या धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली होती. या भोजन कार्यक्रमाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी कोणालाही निमंत्रित करण्यात आले नव्हते. थरुर यांना मात्र निमंत्रण होते.
राहुल गांधी यांचा सल्ला
संसदेत सत्ताधारी पक्षाचे नेते बोलत असताना त्यांच्या भाषणांमध्ये आक्रमकपणे व्यत्यय आणा आणि हस्तक्षेप करा, असा संदेश राहुल गांधी यांनी शुक्रवारच्या बैठकीत आपल्या पक्षाच्या खासदारांना दिला, अशी माहिती देण्यात आली आहे. संसदेत ‘एसआयआर’ संबंधी चर्चेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उत्तर देत असताना त्यांच्या भाषणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला होता. त्यावेळी शाह अत्यंत दबावाखाली आले होते आणि बोलताना त्यांचे हात थरथरत होते, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेस खासदारांनाही असा दबाव आणण्याचा सल्ला दिला, असे बोलले जात आहे.