सां जुझे दी आरियालमधील ठकसेन महिलांना अटक
नौदलात नोकरीच्या आमिषाने घातला 16 लाखांचा गंडा
मडगाव : कारवार येथील नौदल तळावर नोकरी देतो असे सांगून 16 लाख रुपयांचा गंडा घातल्याच्या आरोपावरून काल गुरुवारी मडगाव पोलिसांकडून दोघींना अटक करण्यात आली आहे. सां जुझे दी आरियाल येथील श्रीमती विशा विष्णू गावडे (53), व श्रीमती सोनिया ऊर्फ रोशन सोमनाथ आचारी (53) यांना अटक करण्यात आली आहे. सोनिया आचारी ही आचारीवाडा सदाशिवगड-कारवार येथे राहणारी आहे. या दोन्ही संशयित आरोपींनी नागमोडे-नावेली येथील सुनील श्रीकांत बोरकर यांना फसविल्याचा आरोप आहे. 20 जानेवारी 2020 ते 30 जून 2020 या दरम्यान या दोन्ही संशयितांनी कारवार येथील नौदल तळावर नोकरी देतो असे सांगून तक्रारदाराकडून विविध बँकांच्या माध्यमांतून एकूण 16 लाख 12 हजार 500 रुपये घेतले आणि नोकरी न देता फसविल्याचा आरोप आहे. गुरुवारी मडगाव पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या 420 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
पूजा नाईकचा नवा कारनामा,सहा लाखांना गंडविल्याची नवी तक्रार दाखल
बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो ऊपयांना गंडा घालणारी ठकसेन पूजा नाईक हिच्या विरोधात ओल्ड गोवा पोलिसस्थानकात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. ही तक्रार सुषमा नाईक यांनी दाखल केली आहे. ओल्ड गोवा पोलिसांनी भादंसंच्या कलम 420 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित पूजा नाईक हिने 05 सप्टेंबर 2020 ते 09 सप्टेंबर 2020 या कालावधीत तक्रारदाराला सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने तक्रारदाराला 6 लाख ऊपये देण्यास प्रवृत्त केले. त्या बदल्यात सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र कित्येक दिवस झाले तरी सरकारी नोकरीचा पत्ताच नव्हता. नोकरी देत नसेल तर पैसे परत मागितले होते, मात्र पैसे देण्यास टाळाटाळ झाल्याने तक्रारदाराने काल गुरुवारी ही तक्रार दाखल केली आहे.