थायलंडची ओपल ‘मिस वर्ल्ड 2025’
भारताची सौंदर्यवती नंदिनी गुप्ता ‘टॉप-8’मधून बाहेर
वृत्तसंस्था/ हैदराबाद
थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्रीने ‘मिस वर्ल्ड 2025’ चा मुकुट जिंकला. भारताची सौंदर्यवती नंदिनी गुप्ता हैदराबाद येथे झालेल्या मिस वर्ल्ड 2025 फिनालेमधून बाहेर पडली आहे. 24 मे रोजी झालेल्या ‘मिस वर्ल्ड टॉप मॉडेल’च्या पहिल्या इव्हेंटमध्ये विजय मिळवून नंदिनी गुप्ता हिने थेट ‘टॉप 40’मध्ये प्रवेश केला होता. मात्र, शनिवारच्या फिनालेदरम्यान ‘टॉप-8’मधून ती बाहेर पडली.
यावर्षी मिस वर्ल्डच्या टॉप-4 स्पर्धकांमध्ये मार्टिनिक (अमेरिका आणि कॅरिबियन), इथिओपिया (आफ्रिका), पोलंड (युरोप) आणि थायलंड (आशिया आणि ओशनिया) यांचा समावेश होता. या चार देशांच्या सौदर्यवतींपैकी थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्रीने 72 व्या मिस वर्ल्डचा मुकुट प्राप्त केला आहे. अंतिम फेरी हैदराबादमधील हायटेक्स एक्झिबिशन सेंटरमध्ये पार पडली.
टॉप 8 मध्ये एकूण 8 स्पर्धक पोहोचल्या होत्या. यामध्ये ब्राझील, मार्टिनिक, इथिओपिया, नामिबिया, पोलंड, युक्रेन, फिलीपिन्स आणि थायलंड यांचा समावेश होता. भारताच्या नंदिनीचे नाव या यादीत समाविष्ट नव्हते. शनिवारी रात्री यासंबंधीची माहिती मिस वर्ल्डच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.