थायलंडचे नेते शिनावात्रा पदच्युत
‘टेलिफोन लीक’ प्रकरणी न्यायालयाचा निर्णय
► वृत्तसंस्था / बँकॉक
थायलंड या देशाचे सर्वोच्च नेत्या पेटोनगटार्न शिनावात्रा यांना तेथील कनिष्ठ घटना न्यायालयाने पदावरुन दूर केले आहे. थायलंडशेजारी असलेल्या कंबोडिया या देशाच्या राजकारण्यांशी गुप्त दूरध्वनी बोलणी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांचे हे दूरध्वनी संभाषण उघड झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. शिनावात्रा या थायलंडचे आतापर्यंतच्या सर्वात कमी वयाच्या नेत्या होत्या. या देशातील धनाढ्या शिनावात्रा कुटुंबातील किंवा या कुटुंबाच्या पाठिंब्याने सत्तेवर आलेले त्या सहाव्या राष्ट्रीय सर्वोच्च नेत्या होत्या. या सर्व सहा नेत्यांना न्यायालयांच्या आदेशावरुन पद सोडावे लागले आहे. हा जगातील एक विक्रम मानला जात आहे. त्यांच्या या पदच्युतीमुळे आता या घराण्यावर संकट कोसळणार आहे, असे बोलले जात असून या घराण्याचे महत्व जाईल, अशी चर्चा आहे.
प्रकरण काय आहे...
शिनावात्रा थायलंडच्या नेत्या असताना या देशाचा शेजारच्या कंबोडिया देशाशी सैनिकी संघर्ष उद्भवला होता. एका जगप्रसिद्ध हिंदू मंदिराच्या स्वामीत्वाच्या अधिकारावरुन हा संघर्ष निर्माण झाला होता. हे मंदीर कंबोडियात असून ते जागतिक पातळीवरचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. येथे प्रत्येक वर्षी दशलक्षावधी दर्शक आणि भाविक येत असतात. हे मंदीर कंबोडियात प्राचीन काळी हिंदू राजांची राजवट असताना निर्माण करण्यात आले होते. हे मंदीर आपल्या स्वामीत्वातील आहे, असे प्रतिपादन थायलंडने सातत्याने अनेक दशकांपासून केले आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्याचे स्वामित्व कंबोडियाला दिले आहे. या वर्षी जून महिन्यात याच मंदीरावरुन दोन्ही देशांमध्ये सैनिकी संघर्ष झाला होता. या सशस्त्र संघर्षाच्या काळात शिनावात्रा यांनी कंबोडियाचे माजी नेते हुन सेन यांच्याशी दूरध्वनीवरुन गुप्त अनधिकृत चर्चा केली होती. मात्र, ती लपून राहिली नाही. ती उघड झाल्याने शिनावात्रा यांच्यावर कार्यवाही करण्यात आली.
राजकीय अस्थिरता
शिनावात्रा यांच्या पदच्युतीमुळे थायलंडमध्ये पुन्हा राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण होईल, असे तज्ञांचे मत आहे. त्यांच्याजागी नव्या नेत्याची निवड करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. शिनावात्रा यांच्या पक्षाची राजकीय शक्ती या धक्क्यामुळे क्षीण झाली आहे. आता देशाच्या सर्वोच्च नेतेपदासाठी तीव्र राजकीय स्पर्धेला तोंड फुटणार आहे. सध्या सर्वोच्च नेतेपदासाठी पाच नेत्यांमध्ये स्पर्धा आहे. त्यांच्यापैकी एकजण नेता होण्याची शक्यता आहे. तथापि, स्पर्धा तीव्र असल्याने नेत्याची निवड करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.
घोडेबाजार रंगणार...
आता देशाच्या सर्वोच्च नेतेपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी या पदाचे प्रतिस्पर्धी धनाचा उपयोग करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे घोडेबाजार रंगणार आहे. उपनेते फुमथाम वेचायेचायी हे स्पर्धेत आघाडीवर आहेत. तथापि, तेच पुढचे नेते असतील, असे निश्चितपणे सांगता येणार नाही, अशी स्थिती आहे. ते सध्या कार्यकारी नेते आहेत. नवी व्यवस्था होईपर्यंत त्यांच्या हाती कारभार राहणार आहे. या सत्तेचा उपयोग करुन ते आपली बाजू भक्कम करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणखी एक नेते प्रयूथ चान-ओचा हेही स्पर्धैत आहेत. ते शिनावात्रा घराण्याच्या जवळचे मानले जातात. अशाच प्रकारे आणखी किमात तीन नेते आता सर्वोच्च नेतेपदासाठी तीव्र स्पर्धा करणार आहेत.
अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार
राजकीय अस्थिरतेचा मोठा परिणाम या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेचा विकासदर केवळ 2.3 टक्के राहींल अशी शक्यता या देशाच्या मध्यवर्ती बँकेने व्यक्त केली आहे. थायलंड ही अशियातील एक उभरती अर्थव्यवस्था म्हणून प्रसिद्ध आहे. ती सध्या संकटात आहे, असे मानले जात आहे.