थायलंडचा कंबोडियावर हवाई हल्ला
कॅसिनोंना केले टार्गेट : एका सैनिकाचा मृत्यू, आठजण जखमी
वृत्तसंस्था/ बँकॉक / फ्नॉम पेन्ह
थायलंड आणि कंबोडियामध्ये पुन्हा हिंसाचार भडकला आहे. थायलंडने सोमवारी सकाळी एफ-16 लढाऊ विमानांचा वापर करून कंबोडियन कॅसिनोवर हवाई हल्ला केला. सदर कॅसिनो हे कंबोडियन लष्करी तळ बनले असून त्यामध्ये अवजड शस्त्रs आणि ड्रोन साठवले जात होते, असा आरोप थायलंडच्या लष्कराने केला आहे. शिवाय, कंबोडिया आपले सैन्य नवीन ठिकाणी तैनात करत असल्यामुळे हवाई हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तथापि, कंबोडियाने थायलंडचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही सैन्यांमधील गोळीबारात एक थाई सैनिक ठार झाला आहे. तसेच आठ जण जखमी झाले आहेत. मे महिन्यात थायलंड आणि कंबोडियामध्ये पाच दिवस चाललेल्या युद्धात 30 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. या संघर्षानंतर दोन्ही देशांनी ऑक्टोबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर संघर्ष मावळण्याची चिन्हे दिसत असतानाच पुन्हा हवाई हल्ले झाल्याने वातावरण तंग झाले आहे. थायलंड आणि कंबोडियामध्ये प्रेह विहार आणि ता मुएन थॉम सारख्या प्राचीन मंदिरांवरून बराच काळ सीमावाद सुरू आहे. ही मंदिरे दोन्ही देशांच्या सीमेजवळ असून दोन्ही देश आजूबाजूच्या जमिनीवर दावा करतात.
कंबोडियाने आरोप फेटाळले
कंबोडियाने थायलंडचे आरोप फेटाळतानाच आम्ही कोणतेही हल्ले केले नाहीत आणि सर्व समस्या शांततेने सोडवू इच्छितो, असे म्हटले आहे. थाई सैन्य अनेक दिवसांपासून चिथावणीखोर कारवाया करत आहे. या लढाईमुळे सीमेजवळ राहणाऱ्या अनेक थाई नागरिकांना त्यांची घरे सोडून पळून जावे लागले आहे. थाई सरकारने आपल्या सुमारे 70 टक्के नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचा दावा केला जात आहे. लढाईदरम्यान एका नागरिकाचा मृत्यू झाला असला तरी तो आजारपणामुळे झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी वाढत्या लढाईबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या संघर्षांमुळे दोन्ही देशांमधील संबंध स्थिर करण्यासाठी केलेले कठोर परिश्रम वाया जाऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
118 वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये वाद
थायलंड आणि कंबोडियामधील सीमावाद 118 वर्षांपूर्वीचा आहे. 1907 मध्ये कंबोडिया फ्रेंच राजवटीखाली असताना दोन्ही देशांदरम्यान 817 किलोमीटरची सीमा तयार करण्यात आली होती. नकाशात प्रेह विहार मंदिर कंबोडियाच्या हद्दीत दाखवण्यात आल्याने थायलंडने याचा निषेध केला होता. 1959 मध्ये हा वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहोचला. 1962 मध्ये न्यायालयाने प्रेह विहार मंदिराला कंबोडियाचा भाग म्हणून मान्यता दिली. थायलंडने हा निर्णय मान्य केला, परंतु आजूबाजूच्या जमिनीवरील दावे आजही सुरू आहेत. याचे परिणाम आजही दिसून येतात.