महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ठाकरेंचा कोकण दौरा जोशात, पण इंडियापासून अंतर?

06:17 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोकणात आगामी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. जाहीर सभांमधून पक्षांतर्गत बंडखोरी आणि संघटनात्मक फुटीमुळे आलेली कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करण्यात ते यशस्वी झालेच, पण राजकीय परिस्थितीमुळे असुरक्षितेची भावना मनात असलेल्या मुस्लिम समाजाचे लक्ष शिवसेनेकडे वेधण्यात ते यशस्वी झाले.

Advertisement

कडवट हिंदुत्वाचा त्याग करून राष्ट्रीयत्वाकडे शिवसेनेची वाटचाल सुरू झाल्याचे या निमित्ताने दिसून आले. मात्र याच दौऱ्यात त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीला अथवा इंडिया आघाडीला फारसे स्थान दिल्याचे दिसून आले नाही. शिवाय या धामधुमीत बहुचर्चित राजापूर बारसुतील रिफायनरी प्रश्नावरही काहीच भाष्य केलेले नाही.

Advertisement

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे पहिल्यांदाच मुंबई बाहेर पडले. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात रायगड, सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय सभा घेतल्या. केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या आमदार वैभव नाईक, राजन साळवी यांच्या निवासस्थानी भेट देऊन शिवसेना ठाकरे गट आपल्या पाठीशी असल्याचा संदेश दिला. तर दुसरीकडे बंडखोर दीपक केसरकर, उदय सामंत यांचा ठाकरे शैलीत समाचार घेतला. एकूणच चार दिवसांच्या या कोकण दौऱ्यात ठाकरे हे कुठेही पत्रकारांना सामोरे गेलेले नाहीत. पत्रकार परिषदेविना झालेला हा कोकणातील त्यांचा पहिलाच दौरा असावा.

कोकणातील प्रत्येक सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर थेट आणि आक्रमक शाब्दीक हल्ले चढवले, आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी तपास यंत्रणांनी टाकलेली धाड, त्यांच्या मालमत्तेच्या केलेल्या किंमतीची यादी, स्वर्गीय शिवसेनाप्रमुखांची खुर्ची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची केली गेलेली किंमत त्यांनी प्रत्येक सभेतून सांगत सरकार आणि तपास यंत्रणांवर  टीकेचे आसूड ओढले. स्थानिक मुद्यांबरोबर राष्ट्रीय मुद्यांवरही भाजप आणि    पंतप्रधान मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न केला. कोकण उद्ध्वस्त करणारे तौत्ते आणि निसर्ग चक्रीवादळांच्या आपत्ती काळात पंतप्रधान मोदी कुठे होते, ते का फिरकले नाहीत असा सवाल करत विकासकामांच्या उद्घाटनासाठी वरचेवर महाराष्ट्रात येणाऱ्या पंतप्रधानांच्या दौऱ्यावर टीका केली. कोकणात कठीण काळात शिवसेनाच मदतीला धावून आल्याचे सांगतानाच पक्ष, चिन्ह आणि नेते हिरावून घेतले असले तरी जनता आपल्याबरोबर असल्याचे सांगत आक्रमकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरायला हवे याची झलक त्यांनी या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने दाखवून दिली.

रायगडमधील माणगाव येथील जाहीर सभेत ठाकरे यांनी ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शत्रू मानत नाही. पण ते मला शत्रू का मानतात. माझी चूक काय?’, तर राजापूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आपले कोणत्याही प्रकारचे वैर नसल्याचे विधान केले. एकीकडे जाहीर सभांमधून भाजपा आणि पंतप्रधानांवर टीकेचा भडीमार सुरू असतानाच दुसरीकडे ठाकरे यांच्या तोंडून निघालेले हे विधान राजकीय विश्लेषकांनाही काहीसे चमत्कारीक वाटले. शिवाय शिवसैनिकांनाही बुचकळयात टाकणारे ठरले. कोकणातील दोन लोकसभा निवडणुका ज्या रिफायनरी भोवती फिरल्या त्या रिफायनरीचा मुद्दा या जनसंवाद यात्रेत मात्र काहीसा बाजूला टाकला गेला. राजापूरमध्ये जाऊनही ठाकरे यांनी सध्याच्या चर्चेतील बारसू रिफायनरीवर अवाक्षरही न काढणे हे अनाकलनीय ठरले.

रायगडमध्ये पक्षांतर्गत बंडखोरीमुळे शिवसेनेची मोठी वाताहत झाली होती. पक्षाचे महाडचे आमदार भरत गोगावले, आ†लबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे असे तीनही आमदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी पक्षाला सोडून गेल्याने संघटनेची ताकद कमी झाली होती. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना जिवंत ठेवली असली तरी संघटनेत कमालीची मरगळ दिसून येत होती. ही मरगळ ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱ्यामुळे दूर झाल्याचे सभेला मिळालेल्या प्रतिसादातून स्पष्ट होत आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने जनाधार गमावलेला नाही याचा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला.

कोकणात ठाकरेंचे आतापर्यंत झालेले सर्व दौरे आणि दोन दिवसांपूर्वींची जनसंवाद यात्रा यामध्ये एक वेगळेपण दिसले ते म्हणजे कडवट हिंदुत्वाचा त्याग करून शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रीयत्वाकडे वाटचाल सुरू केल्याचे या निमित्ताने दिसून आले. कोकणात साधारणपणे तेरा ते चौदा टक्के मुस्लिम समाज असल्याचे सांगितले जाते. मध्यंतरीच्या राजकीय परिस्थितीत असुरक्षितेची भावना मनात असलेल्या मुस्लिम समाजाला शिवसेनेच्या प्रवाहात जोडण्याचा प्रयत्न जनसंवाद यात्रेत करण्यात आला. रायगडमध्ये पेण येथील सभेत गुजरातमधील बिल्कीस बानो प्रकरणावर भाष्य केलं. रत्नागिरी, रोहा, म्हसळा आणि माणगाव येथे झालेल्या सभांना मुस्लिम समाजाने चांगला प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने भाजपशी जुळवून घेतल्यामुळे मुस्लिम समाजात नाराजी होती, त्यांच्यात असुरक्षिततेची भावना होती. ही बाब ठाकरे यांनी अचूक हेरली. आपल्या प्रत्येक भाषणात त्यांनी मुस्लिम समाजाला साद घालण्याचा प्रयत्न केला. रायगडमधील मोर्बा, म्हसळा, रत्नागिरी येथे मुस्लिम समाजाच्यावतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले गेले. मराठी भाषेतील कुराणाची प्रत त्यांना भेट म्हणून देण्यात आली. ही घटना त्यांनी पुढे सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील सभांमध्ये सांगून शिवसेनेचे हिंदुत्व हे घर चालवणारे तर भाजपचे घर पेटवणारे हिंदुत्व असल्याचे सांगत मुस्लिम समाजाला शिवसेनेच्या प्रवाहाशी जोडण्यात यशस्वी ठरल्याचे या निमित्ताने दिसून आले.

कोकणातील जनसंवाद यात्रेत बऱ्याच ठिकाणच्या सभांमध्ये व्यासपीठावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेसचे पदाधिकारी यांना मानाचे स्थान दिले गेले. पण ठाकरे यांनी संपूर्ण दौऱ्यात राज्यातील महाविकास आघाडी अथवा देशपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना फारसे महत्त्व दिल्याचे दिसून आले नाही. प्रत्येक सभांना संबोधित करताना ठाकरे यांच्याकडून इंडिया आघाडीचा उल्लेख केला गेला नाही. मोदींवर टीकास्त्र सोडतांनाच राहुल गांधी, सोनिया गांधी यांची भलावण केली नाही. केवळ आपल्या पक्षावर फोकस करत कोकणातील चार दिवसांच्या जनसंवाद दौऱ्यात पक्षसंघटनेला नवचैतन्य देण्यात उध्दव ठाकरे यशस्वी ठरले आहेत. मात्र या दौऱ्याचा मतदारांवर कितपत प्रभाव पडला हे आगामी लोकसभा निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.

ठाकरेंची जनसंवाद यात्रा कोकणातील दोन मतदारसंघात फिरली. यापैकी रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेना नेते विनायक राऊत आणि रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. रायगडमध्ये गेल्यावेळी पराभूत झालेले माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे पराभवानंतर दीर्घकाळाच्या राजकीय विश्रातीनंतर वर्षभरापूर्वी शिवसेना फुटीवेळी पुन्हा सक्रीय झाले.

आता ठाकरेंबरोबरच्या जनसंवाद यात्रेच्या व्यासपीठावर पुन्हा आपल्या हाताच्या मुठी आवळून निवडणूक जिंकणारच या अविर्भावात वावरताना दिसले. तर रत्नागिरीतील यात्रेत विनायक राऊत यांचाही सहजरित्या वावर बरंच काही सांगून जात होता. सभांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून राऊत एवढे बिनधास्त आहेत की चर्चेत असलेल्या राजकीय भूकंपामुळे ते मात्र येणारा काळच ठरवणार आहे.

राजेंद्र शिंदे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article