Solapur News : पंढरपूरात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाची निदर्शने
सीना व भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना पुराचा फटका
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी तहसील कार्यालय पंढरपूर येथे निवेदन देण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात सीना नदीकाठ व भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना वारंवार पुराचा फटका बसला आहे. संकटातून शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करणे गरजेचे झाले आहे. सरकारने स्वतंत्ररित्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत केली पाहिजे.
तर राज्य सरकारने निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळत कर्जमाफी करावी तसेच मागील तीन महिन्यात झालेल्या सतत अतिवृष्टीमुळे भाळवणी तसेच भंडीशेगाव सर्कल तसेच तालुक्यातील इतरही गावे नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित आहेत. त्वरित पंचनामे करावेत या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आले.
जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळे तसेच वारंवार आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने जाहीर केलेली भरपाई अतिशय तोकडी असून पंजाब सरकारप्रमाणे हेक्टरी ५० हजार रुपये मदतीसह संपूर्ण कर्जमाफी शासनाने केली पाहिजे.
शासनाने शेतकऱ्यांना मदत देण्याच्या नावाखाली उसातून प्रतिटन १५ रुपये वसूल करण्याचा जुलमी निर्णय शासनाने घेतला आहे तो त्वरित रद्द करावा अशी मागणी यावेळी केली.
यावेळी जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, युवा सेना सहसचिव स्वप्नील वाघमारे, उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत घाडगे, काकासाहेब बुराडे, जयवंत माने, तालुकाप्रमुख बंडू घोडके, शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर, रणजित कदम, शिवाजी जाधव, नागेश रितूड, उत्तम कराळे, संजय घोडके आदी उपस्थित होते.