शहरात टीईटी परीक्षा सुरळीत; 37 केंद्रांवर 13 हजार उमेदवारांची हजेरी
बेळगाव : कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी बेळगावसह राज्यभरात घेण्यात आली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 37 केंद्रांवर 13 हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. यावर्षी सेवेत असलेल्या शिक्षकांनीही टीईटी दिल्यामुळे परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची कसून तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जात होता. टीईटीचे दोन पेपर सकाळी व संध्याकाळी अशा सत्रामध्ये पार पडले. पहिली ते पाचवीसाठी पहिला पेपर सकाळी 9.30 ते दुपारी 12 या वेळेत झाला. तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी दुसरा पेपर दुपारी 2 ते सायंकाळी 4.30 या वेळेत झाला. पहिल्या पेपरसाठी 4 हजार 022 तर दुसऱ्या पेपरसाठी 9 हजार 066 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. बेळगाव शहरातील अधिकतर हायस्कूलमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.
उमेदवारांमुळे शहर गजबजले
रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील उमेदवार शहरात दाखल होत होते. बस, रेल्वेने मोठ्या संख्येने उमेदवार शहरात आल्याने सकाळच्या सत्रात एकच गर्दी झाली होती. बसस्थानकात तर उमेदवारांचीच गर्दी दिसून आली. अनेकांना परीक्षा केंद्र माहिती नसल्यामुळे त्यांना रिक्षाचालकांचा आधार घ्यावा लागला. शहरातील अनेक सरकारी शाळांमधील शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाने एका निकालादरम्यान सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे याचा धसका घेऊन अनेक सरकारी तसेच खासगी शाळांमधील शिक्षकांनी टीईटीसाठी अर्ज दाखल केला होता. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली होती. तर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात सुरळीतपणे परीक्षा पार पडल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तान्हुल्यांना घेऊन महिला परीक्षा केंद्रावर
मागील दहा ते पंधरा वर्षांत डीएड् बीएड् करणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामध्ये सर्वाधिक महिलांची संख्या होती. परंतु, सरकारी सेवा उपलब्ध नसल्याने टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी सर्व उमेदवारांची धडपड सुरू आहे. रविवारी जिल्हाभरातील महिला आपल्या तान्हुल्यांना घेऊन परीक्षा केंद्रांवर दाखल झाल्या होत्या. परीक्षा काळात आपल्या कुटुंबीयांकडे तान्हुल्यांना देऊन त्यांनी परीक्षा दिली. त्यामुळे शिक्षक होण्याचे स्वप्न आता तरी पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता.