Solapur News : TET निर्णयाचा धसका; अपात्रांना पदोन्नतीसाठी अधिकाऱ्यांची धडपड!
शिक्षण प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी
पाटकुल : सुप्रीम कोर्टाने १ सप्टेंबर रोजी दिलेल्या TET संदर्भातील निर्णयानंतर, जिल्ह्यातील काही संस्थाचालक आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी नियमांची सरळसोट तिलांजली देत TET अपात्र उमेदवारांना पदोन्नती मिळवून देण्यासाठी सक्रीय झाले असल्याची गंभीर माहिती पुढे येत आहे.
जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक या पदांसाठी पदोन्नतीचे प्रस्ताव पाठविताना TET पात्रता अनिवार्य असतानाही, काही संस्थांनी हेतूपुरस्सर अपात्रांना यादीत सामावून घेऊन पदोन्नतीची प्रक्रिया पुढे सरकवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप शिक्षकवर्गातून करण्यात आला आहे. नियम धुडकावून देण्याचा हा उपक्रम धावतपळीत पार पडत असल्याचेही सांगितले जात आहे.
शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात अपात्र उमेदवारांना कोणतीही सूट देण्याचा उल्लेख नसतानाही काही संस्था आणि प्रशासकीय अधिकारी मिळून नियमांचे वळण घालण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकारामुळे पात्र कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, शिक्षण प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ही अनियमितता रोखावी, अशी मागणी वाढत आहे.
शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे की, पदोन्नती प्रक्रिया नियमबद्ध आणि पारदर्शक न ठेवल्यास शाळांच्या गुणवत्तेवर तसेच प्रशासकीय रचनेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असून, नियमांची काटेकोर अंमलबजावणीच शिक्षण व्यवस्थेला स्थिरता देऊ शकते.