For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टेस्ट स्पेशालिस्ट निवृत्त!

06:58 AM Aug 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
टेस्ट स्पेशालिस्ट निवृत्त
Advertisement

चेतेश्वर पुजाराचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा : सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद, नवी दिल्ली

महान फलंदाज राहुल द्रविडनंतर जर भारतीय कसोटी संघाची नवी भिंत म्हणून कोणाला ओळखलं जात असेल, तर तो म्हणजे चेतेश्वर पुजारा. पण आता ही भिंतही ढासळली आहे. कारण, पुजाराने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुजाराने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2023 मध्ये खेळला होता. यानंतर भारतीय संघात त्याला पुनरागमनाची संधी मिळाली नाही. अखेर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पुजाराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत क्रिकेटला अलविदा केले आहे.

Advertisement

टी-20 क्रिकेटच्या युगात फक्त कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचं काम पुजाराने केले. पुजाराला 2008 मध्ये टीम इंडियात पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यावेळी राहुल द्रविड देखील कसोटी संघाचा भाग होता. राहुल द्रविडला भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखले जात असे पण द्रविडनंतर पुजाराने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. गेल्या दशकाभरात तो भारतीय कसोटी संघातील मधल्या फळीतील मजबूत भिंत म्हणून उभा राहिला. मायदेशात आणि परदेशातही त्याने टिच्चून फलंदाजी करत गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. पण, मागील काही वर्षापासून भारतीय संघात त्याला पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही. अर्थात, आगामी काळातील स्पर्धा पाहता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट

पुजाराने सोशल मीडियावरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. भारतीय जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीत गाणं आणि प्रत्येक वेळी मैदानावर उतरताना आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणं, या सर्व अनुभवांना शब्दांत मांडणे अशक्य आहे.  माझ्या क्रिकेट कारकिर्दीत मला मिळालेल्या संधी आणि पाठिंब्याबद्दल मी बीसीसीआय आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आभार मानू इच्छितो.

पुजाराची कारकीर्द

पुजाराने 2010 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून 2023 पर्यंत त्याने 103 कसोटी आणि फक्त 5 एकदिवसीय सामने खेळले. 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त 51 धावा केल्या. तो 2013 ते 2014 पर्यंत या स्वरूपात खेळला. त्याला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही संधी मिळाली नाही. त्याच वेळी, पुजाराने 103 कसोटी सामन्यांमध्ये 7195 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 19 शतके, 35 अर्धशतके आणि 3 द्विशतकांचा समावेश आहे.

राजकोटसारख्या छोट्या शहरात राहत असताना भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिले होते. या खेळाने मला राज्याचे आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एक शेवट असतो आणि आता तो आला आहे. मी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपणा सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

चेतेश्वर पुजारा, भारतीय क्रिकेटपटू

Advertisement
Tags :

.