घाबरायचं की जगायचं?
एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झालेले तीन बालरुग्ण भारतात सापडले असल्याने माध्यमांमधून गहजब सुरू झाला आहे. चीनमध्ये या श्वसनाशी संबंधित संसर्गामुळे मोठी आफत आली असल्याचा गवगवा सुरू आहे. मात्र पाचच वर्षांपूर्वी कोरोनाच्या प्रचंड मोठ्या संकटाला सामोरे गेल्यानंतर आता अशाच प्रकारच्या इतर संकटांना घाबरायचे की या संसर्गासह जगण्याची तयारी करायची? याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात उपचाराच्या पद्धती बाबत असणारे अज्ञान, अशी प्रकरणे हाताळण्याचा नसलेला अनुभव आणि सर्वसामान्यांची उडालेली घाबरगुंडी या सर्वाचा परिणाम होऊन श्वसनाच्या एका विकाराने लाखो बळी घेतले. नंतर हा प्रकार सामान्य समजला जाऊन, थोडीशी काळजी घेऊन उपचार सुरू करण्यात आले आणि हळूहळू जग पुन्हा पूर्वपदावर आले. डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायांचा अवलंब, सुरक्षित अंतर, विलगीकरण आणि स्वत:ची प्रकृती सांभाळण्यासाठीचे सावधपण याच्या जोरावर जग त्या महामारीतून बाहेर पडले. पाच वर्षानंतर पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवेल अशी भीती बाळगून आता पुन्हा स्वत:ला घरात डांबून घेता येईल का? तसे जिणे नको असेल तर त्यावर सर्वांना विचार करावा लागणार आहे. अशा आव्हानांना घाबरायचे की त्यावर मात करायची? याचा निर्णय घ्यायचा झाला तर जगातील कोणताही देश मात करण्याचाच निर्णय घेणार यात शंका नाही. आता जग स्वत:ला कडीकुलपात बंदिस्त करून घेऊ शकत नाही. तशा प्रकारची सक्तीची टाळेबंदी त्या काळात योग्य होती असे म्हणता येईल. पण, आज पुन्हा जगाची गती थांबवणे कोणालाही परवडणारे नाही. त्याऐवजी असा त्रास होणाऱ्या मंडळींपुरते विलगीकरण आणि प्रभावी उपचार, संसर्ग होऊ नये यासाठी काळजी याद्वारे या समस्येवर मात करण्याचा विचार करावा लागेल. तज्ञ भारतीय डॉक्टरांच्या मतानुसार सध्याचा जिवाणू हा काही डॉक्टरांना अनभिज्ञ नाही. वीस वर्षांपासून माहिती उपलब्ध आहे. हिवाळ्याच्या काळात याच्या संसर्गाची प्रकरणं समोर येतात. हा फ्लूसारखा विषाणू आहे. यासाठीही सामान्य सर्दीला दिली जाणारी औषधंच दिली जातात. तसंच आजारी व्यक्तीला आरामाचा सल्ला दिला जातो. बहुतांश प्रकरणांत रुग्णालयात दाखल करण्याचा सल्लाही दिला जात नाही. लहान मुलांना आणि वृद्धांना याच्याबाबतीत काळजी घ्यावी लागते. आतापर्यंत या विषाणूच्या संसर्गाची जी प्रकरणं समोर आली आहेत, त्यात अगदी किरकोळ लक्षणं दिसली आहेत. दमा आणि सीओडीपी सारख्या श्वसनाशी संबंधित रुग्णांना श्वास घ्यायला त्रास, थकवा आणि ताप अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो असे भारतीय डॉक्टरांचे मत आहे. कर्नाटक आणि गुजरातमधील काही लहान मुलांना याचा त्रास झाल्याचे आढळून आले असले तरी त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. त्यामुळे भारतात फार मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होईल असे सध्याला तरी दिसत नाही. शिवाय अशी प्रकरणे कशी हाताळायची याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहेत. त्याचे पालन केले तर या समस्येला न घाबरता त्याच्यासह जगण्याची आणि त्यावर मात करण्याची सवय लावून घेता येऊ शकते. चीनमधील या विषाणूचा स्ट्रेन किती घातक आहे ते काही दिवसांत समजेल. तोपर्यंत सध्या सुरू असणाऱ्या उपचार पद्धतीवर विश्वास ठेवून सुरक्षेचे नियम सर्वांना पाळावे लागतील. खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या तुषारांतील कणांद्वारे या विषाणूचा प्रसार होतो आणि इतरांना संसर्ग होतो. हात मिळवणे, गळा भेट घेणे किंवा एकमेकांना स्पर्श केल्यानेही हा विषाणू पसरू शकतो. खोकला किंवा शिंकल्याने एखाद्या भागावर तुषार पडले असतील आणि त्याठिकाणी स्पर्श केलेला हात आपण चेहरा, नाक, डोळे किंवा तोंडाला स्पर्श केला तरीही संसर्ग होऊ शकतो. भारतीय डॉक्टर याबाबतीत उपाय सांगताना, एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग असलेली व्यक्ती किंवा एखाद्याला सर्दी असेल तर त्याच्यापासून दूर राहा असा सल्ला देतात. खोकताना-शिंकताना तोंडावर रुमाल किंवा कापड ठेवा. त्यासाठी वेगळा रुमाल किंवा टॉवेल वापरा. काही तासांनी ते साबणाने स्वच्छ धुवा. सर्दी-खोकला असेल तर मास्क परिधान करा आणि घरीच आराम करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे कोरोनात निर्माण झाली तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होईल, भारतात हाहाकार माजेल अशी कोणतीही भीती न बाळगता समोर असणाऱ्या आव्हानाला टाळण्यासाठी जे उपाय आपल्या हाती आहेत ते सर्वप्रथम योजले म्हणजे अशा संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच मिळतो हे यापूर्वीही सिद्ध झाले आहे. कोरोनाच्या विषाणूने अनेकदा स्वत:त बदल केला तरीसुद्धा बदलत्या व्हेरियंटवर मात करत भारतात देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोनावर उपचार झाले तर भारतीय वैद्यकीय व्यवस्थेला हे आव्हान आता नवे राहिलेले नाही हे सहज समजून जाईल. अशा प्रकारच्या आव्हानात्मक महामारीला कसे सामोरे जायचे हे आता आपल्याही अंगवळणी पडले आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वीचा काळ आठवून त्याच्या अंतिम काळात आव्हानाला सामोरे जाण्याचा निर्धार केला होता तो लक्षात घेऊन पुन्हा एकदा स्वत: काही नियम पाळले तर पुन्हा टाळेबंदीसारखी चूक आपणास करावी लागणार नाही. आधीपासून श्वसनाचे आजार असणाऱ्या मंडळींना जपले आणि अशा प्रकारचा त्रास होणाऱ्या लहान आणि ज्येष्ठ रुग्णांना विलगीकरणासह योग्य उपचाराची व्यवस्था केली तर कोणताही गहजब माजणार नाही. या दृष्टीने या आव्हानाकडे पाहिले गेले तर कोणतीही कटकट न होता या संकटातून हा थंडीचा काळ मार्ग काढण्यास उपयुक्त ठरू शकतो. जागतिक पातळीवर अशाच पद्धतीचा विचार पुढे येऊन अशा विषाणूंच्या सोबत जगण्याची आणि त्यावर मात करण्याची जिद्द जगाला बाळगावीच लागणार आहे हे ज्याच्या डोक्यात पक्के बसेल त्याला अशा कोणत्याही आव्हानाला सामोरे जावे लागणार नाही.