For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

14 बळींसह कसोटीचा पहिला दिवस गोलंदाजांचा

06:25 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
14 बळींसह कसोटीचा पहिला दिवस गोलंदाजांचा
Advertisement

हॅझलवूडचे पाच बळी, स्टार्कचे 3 बळी, न्यूझीलंड 162,  ऑस्ट्रेलिया 4 बाद 124, हेन्री प्रभावी

Advertisement

वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च

यजमान न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या सामन्यातील खेळाचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला. दिवसभरात एकूण 14 गडी बाद झाले. ऑस्ट्रेलियाच्या हॅझलवूडने 31 धावात 5 गडी बाद केले. न्यूझीलंडचा पहिला डाव 162 धावात आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर पहिल्या डावात 4 बाद 124 धावा जमवल्या होत्या. न्यूझीलंडच्या हेन्रीने प्रभावी गोलंदाजी केली.

Advertisement

या मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच जिंकून आघाडी घेतली आहे. या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. वेगवान गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या हॅझलवूड आणि स्टार्क यांच्यात भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा पहिला डाव 162 धावात आटोपला. न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक नोंदवता आले नाही.

लॅथम आणि यंग यांनी न्यूझीलंडच्या डावाला सावध सुरुवात करताना 18.5 षटकात पहिल्या गड्यासाठी 47 धावांची भागीदारी केली. स्टार्कने यंगला 14 धावावर झेलबाद केले. हॅझलवूडच्या स्विंग गोलंदाजीवर लॅथम कॅरेकरवी झेलबाद झाला. त्याने 69 चेंडूत 7 चौकारांसह सर्वाधिक म्हणजे 38 धावा जमवल्या. रचिन रवींद्र हॅझलवूडच्या गोलंदाजीवर 4 धावा जमवत तंबूत परतला. उपाहारावेळी न्यूझीलंडने 3 बाद 71 धावापर्यंत मजल मारली होती.

खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाला आणि चहापानापर्यंतच्या दोन तासांच्या कालावधीत न्यूझीलंडचे उर्वरित सात फलंदाज 91 धावात बाद झाले. मिचेलने 4 धावा केल्या. विल्यम्सनने 37 चेंडूत 2 चौकारांसह 17 धावा जमवल्या. ब्लंडेलने 31 चेंडूत 3 चौकारांसह 22 धावा केल्या. फिलिप्स दोन धावावर बाद झाला. कुगलेजीनला आपले खाते उघडता आले नाही. न्यूझीलंडची यावेळी स्थिती 8 बाद 107 अशी केविलवाणी झाली होती. मॅट हेन्री आणि कर्णधार साऊदी यांनी 9 व्या गड्यासाठी 55 धावांची भागीदारी केल्याने न्यूझीलंडला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. हेन्रीने 28 चेंडूत 5 चौकारांसह 29 तर साऊदीने 20 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 26 धावा केल्या. 45.2 षटकात न्यूझीलंडचा पहिला डाव 162 धावात आटोपला. न्यूझीलंडचे पहिले अर्धशतक 120 चेंडूत, शतक 214 चेंडूत तर दीडशतक 258 चेंडूत नोंदवले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे हॅझलवूडने 31 धावात 5 तर स्टार्कने 59 धावात 3 गडी बाद केले. कमिन्स आणि ग्रीन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

चहापानानंतर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली पण 9 व्या षटकात सिरेसने स्मिथला पायचित केले. त्याने 2 चौकारांसह 11 धावा जमवल्या. हेन्रीच्या गोलंदाजीवर ख्वाजाचा त्रिफळा उडाला. त्याने 2 चौकारांसह 16 धावा केल्या. लाबुशेन आणि ग्रीन यांनी संघाचा डाव बऱ्यापैकी सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली. हेन्रीच्या इनस्विंगरवर ग्रीनचा त्रिफळा उडवला. त्याने 40 चेंडूत 6 चौकारांसह 25 धावा जमवल्या. पहिल्या दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी हेन्रीने ऑस्ट्रेलियाला आणखी धक्का देताना हेडला झेलबाद केले. त्याने 19 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21 धावा जमवल्या. लाबुशेन 80 चेंडूत 8 चौकारांसह 45 धावावर तर नाईट वॉचमन लियॉन एका धावेवर खेळत आहे. न्यूझीलंडच्या हेन्रीने 39 धावात 3 तर सिरेसने 38 धावात एक गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाचा संघ अद्याप 38 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे सहा गडी खेळावयाचे आहेत.

स्टार्कने लिलिला टाकले मागे

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक बळी घेणाऱ्या कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजांच्या यादीत चौथे स्थान मिळवताना यापूर्वीच्या ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिलीला मागे टाकले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शुक्रवारी स्टार्कने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 59 धावात 3 गडी बाद केले. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियन संघातील वेगवान गोलंदाज स्टार्कने अलीकडच्या कालावधीत आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या यादीत स्टार्कने आता चौथे स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज डेनिस लिली यान कसोटी क्रिकेटमध्ये 355 बळी घेत चौथे स्थान मिळवले होते. आता स्टार्कने लिलीला मागे टाकत चौथे स्थान हस्तगत केले आहे. या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न 708 बळींसह पहिल्या, ग्लेन मॅकग्रा 563 बळींसह दुसऱ्या, नाथन लियॉन 527 बळींसह तिसऱ्या, मिचेल स्टार्क 357 बळींसह चौथ्या तर लिली 355 बळींसह पाचव्या स्थानावर आहे.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड प. डाव 45.2 षटकात सर्वबाद 162 (लॅथम 38, ब्लंडेल 22, यंग 14, विल्यम्सन 17, हेन्री 29, साऊदी 26, अवांतर 6, हॅझलवूड 5-31, स्टार्क 3-59, कमिन्स 1-35, ग्रीन 1-21), ऑस्ट्रेलिया प. डाव 36 षटकात 4 बाद 124 (स्मिथ 11, ख्वाजा 16, लाबुशेन खेळत आहे 45, ग्रीन 25, हेड 21, लियॉन खेळत आहे 1, अवांतर 5, मॅट हेन्री 3-39, सीयर्स 1-38).

Advertisement
Tags :

.