For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्थवर उसळला बुमराह

06:59 AM Nov 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
पर्थवर उसळला बुमराह
Advertisement

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी, पहिली कसोटी : टीम इंडियाप्रमाणेच कांगारुंचा डावही गडगडला

Advertisement

वृत्तसंस्था/ पर्थ

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पहायला मिळाले. या सामन्याचा पहिला दिवस गोलंदाजांच्या नावावर राहिला आणि फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करावा लागला. प्रारंभी, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पहायला मिळाला आणि पाहुणा संघ केवळ 150 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचे फलंदाजही विशेष काही करू शकले नाहीत आणि 67 धावांत 7 गडी गमावले. ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या तुलनेत अजूनही 83 धावांनी मागे आहे. आतापर्यंत एकाही ऑसी फलंदाजांला 20 च्या वर जाता आलेले नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अॅलेक्स कॅरी 19 व मिचेल स्टार्क 6 धावांवर खेळत होते.

Advertisement

प्रारंभी, टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला.  सलामीवीर यशस्वी जैस्वाल आपले खातेही उघडू शकला नाही आणि तिसऱ्याच षटकात स्टार्कने त्याला आऊट केले. यानंतर देवदत्त पडिक्कलला भोपळाही फोडता आला नाही. विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम राहिला आणि त्याच्या बॅटमधून फक्त 5 धावा आल्या. सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या केएल राहुलने काही काळ टिकून राहण्याचा प्रयत्न केला पण तोही 74 चेंडूत 26 धावा करून बाद झाला.

नितीश कुमार रेड्डी , पंतची चमक

ध्रुव जुरेलला आपल्या चांगल्या फॉर्मचा फायदा घेता आला नाही आणि तो 11 धावा करुन आऊट झाला. वॉशिंग्टन सुंदरनेही निराशा केली आणि त्याच्या बॅटमधून केवळ 4 धावा आल्या. यावेळी टीम इंडियाची 6 बाद 73 अशी स्थिती होती. यावेळी ऋषभ पंत आणि नवोदित नितीश रेड्डी  यांनी 48 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 121 पर्यंत नेली. ही जोडी मैदानावर असेपर्यंत भारतीय संघ दोनशेचा टप्पा पार करेल असे वाटत होते, पण पॅट कमिन्सने पंतला बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. पंतने 78 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारासह 37 धावांचे योगदान दिले. यानंतर हर्षित राणा 7 तर बुमराह 8 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतले. शेवटची विकेट म्हणून बाद होण्यापूर्वी नितीशने 59 चेंडूंत 41 धावा केल्या, ज्यात सहा चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. टीम इंडियाचा डाव 49.4 षटकांत 150 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून हॅजलवूडने सर्वाधिक चार बळी घेतले. याशिवाय मिचेल स्टार्क, मिचेल मार्श व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन-दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.

बुमराहसमोर कांगारुंचे लोटांगण

भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहचा कहर ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सुरुवातीलाच पहायला मिळाला. पर्थच्या हिरव्यागार उसळत्या खेळपट्टीवर बुमराहने (17 धावांत  4 बळी) शानदार गोलंदाजी करताना कांगारुंची चांगलीच भंबेरी उडवली. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या डावात केवळ 10 धावा करु शकणाऱ्या नॅथन मॅकस्विनीला त्याने प्रथम बाद केले. उस्मान ख्वाजाही 8 धावा करुन बाद झाला, तर स्टीव्ह स्मिथ खातेही उघडू शकला नाही आणि पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. 19 धावांत तीन विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियन चाहत्यांना ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण भारतीय गोलंदाजांनी तसे होऊ दिले नाही. वेगवान गोलंदाज हर्षित राणाने पदार्पणाच्या कसोटीत हेडला बाद केले. तो दोन चौकारांच्या मदतीने 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर मिचेल मार्शही सहा धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्नस लाबुशेन 52 चेंडूत केवळ दोन धावा करु शकला. सिराजने दोघांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कर्णधार पॅट कमिन्सला केवळ तीनच धावा करता आल्या. यानंतर अॅलेक्स कॅरी व मिचेल स्टार्क यांनी दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 27 षटकांत 7 बाद 67 धावा केल्या होत्या. केरी 3 चौकारासह 19 तर स्टार्क 6 धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव 49.4 षटकांत सर्वबाद 150 (जैस्वाल 0, पडिक्कल 0, केएल राहुल 26, विराट कोहली 5, पंत 37, जुरेल 11, सुंदर 4, नितीशकुमार रे•ाr 41, हर्षित राणा 7, हॅजलवूड 4 बळी, कमिन्स, स्टार्क व मार्श प्रत्येकी दोन बळी).

ऑस्ट्रेलिया पहिला डाव 27 षटकांत 7 बाद 67 (उस्मान ख्वाजा 8, मॅकस्विनी 10, लाबुशेन 2, स्मिथ 0, हेड 11, कॅरी खेळत आहे 19, मिचेल स्टार्क खेळत आहे 6, बुमराह 4 बळी, सिराज 2 तर राणा 1 बळी).

स्मिथची विकेट अन् बुमराहचा अनोखा विक्रम

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. बुमराहने पहिल्याच चेंडूवर स्मिथला बाद केले आणि भारताला घवघवीत यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही मैदानात स्टीव्ह स्मिथला पहिल्या चेंडूवर आतापर्यंत कोणालाही बाद करता आले नव्हते. यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये स्मिथला पहिल्या चेंडूवर बाद करण्याचा मान आता बुमराहला मिळाला आहे. यापूर्वी जगभरातील कोणत्याही गोलंदाजाला स्मिथला ऑस्ट्रेलियात पहिल्या चेंडूवर बाद करता आलेले नाही.

भर मैदानातच लाबुशेन व सिराज यांच्यात राडा

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी दरम्यान स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन आणि भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यात जोरदार बाचाबाची पाहायला मिळाली. यावेळी सिराज लाबुशेनवर चांगलाच संतापला होता. सिराज आणि लाबुशेन यांच्यातील या वादाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. वास्तविक, डावातील 13 व्या षटकात मोहम्मद सिराजने लाबुशेनला चेंडू टाकला, जो त्याला समजू शकला नाही. चेंडू त्याच्या बॅटच्या अगदी जवळ पडला. यावेळी लाबुशेन क्रीजच्या बाहेर असल्यामुळे सिराजने त्याला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र सिराज चेंडूजवळ पोहोचताच लाबुशेनने त्याच्या बॅटने चेंडू मारला आणि चेंडू दूर गेला. यावर सिराजने अंपायरकडे पाहिले, मात्र त्याला अंपायरकडून विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सिराज आणि लाबुशेन यांच्यात काहीतरी बोलणे झाले ज्यामुळे वातावरण थोडावेळ तापले होते.

हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डीचे कसोटी पदार्पण

टीम इंडियाकडून दोन खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. नितीश कुमार रेड्डी ला भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने पदार्पणाची कॅप दिली तर हर्षित राणाला फिरकीपटू अश्विनने डेब्यू कॅप दिली. नितीशकुमार रेड्डी हा अष्टपैलू खेळाडू असून हर्षित राणा वेगवान गोलंदाज आहे. या दोघांकडून पहिल्या कसोटीत शानदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

पर्थवर पंतचा धमाका

ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या फलंदाजीने चाहत्यांना रोमांचित केले. त्याने भलेही 78 चेंडूत 37 धावा केल्या असतील, पण त्याच्या खेळण्याची शैली अनोखीच होती. या काळात ऋषभ पंतने 47.44 च्या स्ट्राईकरेटने फलंदाजी करत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. फलंदाजीदरम्यान ऋषभ पंतच्या एका शॉटने ऑस्ट्रेलियन समालोचकही हैराण झाले होते. पंत मैदानात असताना अनेक मोठे फटके पाहायला मिळणार हे निश्चित. पण मोठे फटके खेळण्याची पंतची पद्धतही इतर फलंदाजांपेक्षा वेगळी आहे, जी त्याने वेगवान गोलंदाजांवर रिव्हर्स स्वीप आणि रिव्हर्स स्कूपसारखे फटके खेळून अनेकदा दाखवली आहे. 42 व्या षटकात कमिन्सच्या शेवटच्या चेंडूवर पंतने ऑफ स्टंपच्या बाहेर एक स्कूप शॉट खेळला आणि हा शॉट खेळत असताना तो खेळपट्टीवर पडला.

केएल राहुलच्या 3000 कसोटी धावा पूर्ण

केएल राहुलने या सामन्यात कसोटीतील 3000 धावांचा टप्पा पूर्ण केला. त्याच्या आता 54 कसोटीतील 92 डावांत 3007 धावा झाल्या असून 33.78 धावांच्या सरासरीने 8 शतके व 15 अर्धशतके नोंदवली आहेत. 199 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

Advertisement
Tags :

.