कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना कंठस्नान

06:58 AM Jul 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘महादेव अभियान’ अंतर्गत यशस्वी कामगिरी,  96 दिवसांनंतर घेतला सूड, आणखी एकाचा शोध

Advertisement

वृत्तसंस्था / श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील पर्यटनस्थळ पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या भीषण आणि धर्मांध दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हशीम मुसा आणि या हल्ल्यात सहभागी असणारा आणखी एक दहशतवादी यासीर यांना भारतीय भूसेनेच्या सैनिकांनी कंठस्नान घातले आहे. या श्रावणातील प्रथम सोमवारी, ‘महादेव अभियान’ या सार्थ नावाच्या अंतर्गत ही महत्त्वपूर्ण कार्यवाही करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरनजीक दाचीगाम येथे झालेल्या चकमकीत या दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. याच हल्ल्यातील तिसऱ्या दहशतवाद्याचा शोध घेतला जात असून त्यालाही लवकरच यमसदनी धाडण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सोमवारी सकाळी झालेल्या या चकमकीत एकंदर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून हे सर्व पाकिस्तानी आहेत.

96 व्या दिवशी प्रत्यक्ष प्रतिशोध

सोमवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 96 दिवस पूर्ण झाले. मधल्या काळात भारताने दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात ‘सिंदूर अभियान’ यशस्वी करत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ नष्ट केले. तसेच पाकिस्तानच्या 15 वायुतळांवर हल्ले चढवून पाकिस्तानची प्रचंड हानी केली. तरीही पहलगाम येथे हल्ला करणारे दहशतवादी जोपर्यंत संपत नाहीत, तोपर्यंत या हल्ल्यातील निरपराध मृतांना खरा न्याय मिळणार नाही, याची जाणीव सेनादलांना होती. त्यामुळे या हल्ल्याचे सूत्रधार आणि हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांचा सातत्याने शोध घेतला जात होता. रविवारी मध्यरात्री त्यांचा ठावठिकाणा गुप्तचरांच्या महितीवरून समजल्यानंतर त्यांना घेरण्याची आणि संपविण्याची योजना हाती घेण्यात आली. सोमवारी सकाळी या हल्ल्यातील 3 पैकी दोन दहशतवाद्यांना टिपण्यात आले.

‘चिनार’ तुकडीचे यश

पहलगाम हल्ला झाल्यापासूनच या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात होता. त्यासाठी भूसेनादलाच्या ‘चिनार’ तुकडीवर विशेष उत्तरदायित्व सोपविण्यात आले होते. संपूर्ण सीमाप्रदेशातील वनांमध्ये रात्रंदिवस या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत होता. गेले अनेक दिवस चाललेल्या या प्रयत्नांना अखेर सोमवारी यश आले. या तुकडीनेच ‘एक्स’ माध्यमावर या अभिमानास्पद यशाचा संदेश प्रसारित केला आहे.

पाकिस्तानला पुन्हा दणका

ठार करण्यात आलेले सर्व दहशतवादी पाकिस्तानी आहेत, हे स्पष्ट झाले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर काही काळ स्वस्थ राहून पुन्हा हिंसाचार भडकविण्याची त्यांची योजना होती. तथापि, भूसेनेच्या तुकडीने त्यांचा शोध लावून त्यांना संपविल्याने पाकिस्तानला हा पुन्हा एकदा मोठा दणका मिळाला आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे दहशतवाद्यांचा शोध 

पहलगाम हल्ल्यात संपर्क ठेवण्यासाठी दहशतवाद्यांनी ‘हुआवेई’ नामक उपग्रहीय दूरध्वनी संचाचा उपयोग केला होता. हा हल्ला झाल्यापासूनच या संचाचा मागोवा भारताच्या अत्याधुनिक दूरसंचार यंत्रणेकडून घेतला जात होता. इतके दिवस हा संच स्वीच ऑफ करून ठेवण्यात आला होता. तथापि, रविवारी मध्यरात्रीनंतर तो पुन्हा एकदा उपयोगात आणला जात आहे, हा संदेश दूरसंचार यंत्रणेच्या माध्यमातून मिळाला. तसेच हा संच कोठून कार्यान्वित करण्यात येत आहे, हेही समजून आले. त्यामुळे दहशतवाद्यांचा नेमका ठावठिकाणाही समजून आला. गुप्त विभागानेही आपली माहिती भूसेनाला पुरविली होती. अशाप्रकारे अत्याधुनिक दूरसंचार तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दहशतवाद्यांना घेरणे सुलभ झाले. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या स्थानाला घेराव घालून ते बॉम्ब आणि गोळीबाराने उडविण्यात आले.  अशाप्रकारे तीन दहशतवादी संपविण्यात आले, अशी माहिती देण्यात आली आहे.

विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

भारताने पाकिस्तानविरोधात कारवाई केली खरी, पण पहलगाम हल्ला घडविणारे दहशतवादी अद्याप कोठे सापडले आहेत? ते निर्धास्तपणे फिरत आहेत, अशी कुत्सित टिप्पणी काही विरोधी पक्षनेत्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांच्या या टीकेला सोमवारी भारतीय सेनेने आपल्या कृतीने योग्य ते प्रत्युत्तर दिले आहे.

अभिमानास्पद...

ड पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला संपविल्याने दहशतवादाला मोठा दणका

ड दहशतवाद्यांच्या संपर्क साधनाचा मागोवा घेत शोधला त्यांचा ठावठिकाणा

ड पहलगाम हल्ला घडविणाऱ्या तीन पैकी दोन दहशतवाद्यांचा केला नायनाट

 

 

Advertisement
Next Article