मद्यपान करून वाहन चालविणारे दहशतवादीच!
कुर्नूल बस दुर्घटनेप्रकरणी हैदराबाद पोलीस आयुक्तांची टिप्पणी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
मद्यपान करून वाहन चालविणारे दहशतवादीच असतात अशी टिप्पणी हैदराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी केली आहे. सज्जनार यांनी स्वत:च्या या सोशल मीडिया पोस्टरमध्ये कुर्नूल येथे झालेल्या बस दुर्घटनेचाही उल्लेख केला आहे. अशाप्रकारे निष्पापांचा जीव घेणाऱ्या या चालकांना कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळू नये असे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. हैदराबादहून बेंगळूरच्या दिशेने जाणाऱ्या बसने पेट घेतल्याने 20 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
मद्यपान करून वाहन चालविणारे चालक दहशतवादी असतात. त्यांचे कृत्य दहशतवादापेक्षा अजिबात कमी नाही. कुरनूलमध्ये झालेली बस दुर्घटना प्रत्यक्षात दुर्घटना नाही. हा एकप्रकारचा नरसंहार होता, जो रोखला जाऊ शकत होता. बाइक चालवताना मद्यपी किंचितही समंजस आणि जबाबदारीने वागला असता तर असे घडले नसते. प्रत्यक्षात हे दुर्लक्ष असे गुन्हेगारी कृत्य आहे, ज्यामुळे अनेक परिवारांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे असे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.
सर्वकाही उद्ध्वस्त करतात
अशाप्रकारचे लोक जीवन, परिवार आणि भविष्य सर्वकाही उद्ध्वस्त करत असतात. हैदराबाद पोलीस ड्रिंक अँड ड्राइव्हवरून झिरो टॉलरन्सचे धोरण राबवत आहेत. मद्याच्या नशेत वाहन चालविताना कुणीही पकडला गेला तर त्याच्या विरोधात कारवाई होणारच. अशाप्रकारच्या व्यक्तीवर कुठलीच दया केली जाणार नाही. मद्यपान करून वाहन चालविण्याला चूक म्हणणे बंद केले जावे. हा एक गुन्हा असून तो अनेक जणांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो. याचमुळे याकरता कठोरातील कठोर शिक्षा असायला हवी असे सज्जनार यांनी म्हटले आहे.
