हमाससारखे हल्ले करण्याचा दहशतवाद्यांचा कट
पाकिस्तानात दहशतवाद्यांना दाखविले जात आहेत व्हिडिओ : लष्कर-ए-तोयबाने खरेदी केले ग्लायडर अन् ड्रोन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये निष्पाप लोकांची कत्तल करणारी हमास ही दहशतवादी संघटना आता पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबासाठी प्रेरणास्रोत ठरली आहे. लष्कर-ए-तोयबाने स्वत:च्या दहशतवाद्यांना हमासच्या नरसंहाराचे व्हिडिओ दाखवून भारतात अशाप्रकारचे हल्ले घडवून आणण्याची तयारी चालविली असल्याचे इनपूट गुप्तचर यंत्रणांना मिळाले आहेत. हमासचे दहशतवादी कशाप्रकारे ग्लायडर आणि हँड ग्लायडरद्वारे इस्रायलमध्ये शिरले होते हे या व्हिडिओंमध्ये दाखविण्यात आले आहे. लष्कर-ए-तोयबाने अशाप्रकारच्या हल्ल्यांसाठी भरभक्कम ड्रोन देखील खरेदी केले आहेत. हे ड्रोन एका व्यक्तीला उचलून घेत उ•ाण करू शकतात. या ड्रोन्सना मॅन लिफ्टिंग ड्रोन म्हटले जाते. याचबरोबर लष्कर-ए-तोयबाने हँड ग्लायडर्सची खरेदी केली आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी पॅराग्लायडर्सच्या मदतीने इस्रायलच्या सीमेत प्रवेश केला होता. त्यानंतर हातातील रायफल्सद्वारे त्यांनी निष्पाप नागरिकांची कत्तल केली होती.
फ्लाइंग ऑब्जेक्ट पाडविण्याचा आदेश
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानंतर सीमावर्ती भागात ड्रोनसंबंधी देखरेख वाढविण्यात आली आहे. सुरक्षा जवानांना कुठल्याही प्रकारचे फ्लाइंग ऑब्जेक्ट पाडविण्याचे आदेश मिळाले आहेत. सीमावर्ती भागांमध्ये रडारद्वारे देखील देखरेख ठेवली जात आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाकडून बंदी
लष्कर-ए-तोयबा ही दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या दहशतवादी संघटनांपैकी एक आहे. हाफिज सईदने 1990 मध्ये अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात या संघटनेची स्थापना केली होती. हाफिज सईद हा लष्कर-ए-तोयबाला सध्या पाकिस्तानच्या लाहोर येथून संचालित करत आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्याची जबाबदारी याच दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या सैन्य राजवटीच्या काळात 12 जानेवारी 2002 रोजी पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबावर बंदी घालण्यात आली होती. तर संयुक्त राष्ट्रसंघाने मे 2005 मध्ये यावर बंदी घातली होती. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून लष्कर-ए-तोयबाला वित्तपुरवठा केला जातो तसेच हाफिज सईदला आयएसआयची सुरक्षा प्राप्त आहे.
गुजरात, काश्मीरमध्ये हल्ल्याचा कट
लष्कर-ए-तोयबा आता हमाससारखा हल्ला गुजरात, राजस्थान, काश्मीर किंवा पंजाबमध्ये घडवून आणण्याचा कट रचत असल्याचे मानले जात आहे. याचमुळे सर्व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे. गृह मंत्रालयाने अशाप्रकारच्या कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी जारी करण्यात आलेल्या एसओपीचे कठोरपणे पालन करण्याचा निर्देश सुरक्षा यंत्रणांना दिले आहेत. पाकिस्तानातील दहशतवादी तळांमध्ये लष्कर-ए-तोयबाकडून हमासच्या हल्ल्यांचे व्हिडिओ दाखविले जात आहेत.