जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्याला कंठस्नान
गोळीबारात हेड कॉन्स्टेबल हुतात्मा : अन्य दोघे जखमी
► वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील बिलवार तालुक्यातील कोग-मंडली येथे रविवारी दुसऱ्या दिवशीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच राहिली. या संघर्षात रविवारी दुपारी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. त्याचा मृतदेह हस्तगत करण्यात आल्याची माहिती जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद जैन यांनी दिली. सुरक्षा दलांनी शनिवार, 28 सप्टेंबर रोजी सदर भागात शोधमोहीम सुरू केली होती. त्यांना तीन ते चार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती मिळाली होती. संध्याकाळी उशिरा दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेल्या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल बशीर अहमद हुतात्मा झाले होते. तर डीएसपी आणि साहाय्यक उपनिरीक्षक असे दोघे जखमी झाले होते. सध्या दोन्ही अधिकाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे.
यापूर्वी कुलगाममधील आदिगाम देवसर भागात शनिवारी चकमक झाली होती. या संघर्षात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तसेच गोळीबारात लष्कराचे चार जवान आणि कुलगामचे एएसपी जखमी झाले होते. आदिगाम चकमकीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. या दहशतवाद्यांपैकी एक आकिब अहमद शेरगोजरी हा बडगाममधील चदूराचा रहिवासी आहे. दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव उमाईस वाणी असे असून तो कुलगाममधील चावलगामचा रहिवासी आहे. दोघेही लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते.