मोदींमुळे दहशतवादाला आळा!
काँग्रेसमुळे देश असुरक्षित : हुक्केरीतील प्रचारसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दावा
संकेश्वर, हुक्केरी : मागील 70 वर्षांत काँग्रेसने मतांचा गठ्ठा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे देश असुरक्षित बनला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या 10 वर्षांत देशातील दहशतवाद संपवून देश सुरक्षित ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी चिकोडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आण्णासाहेब जोल्ले यांना मत देऊन विजयी करावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. शुक्रवारी हुक्केरी येथे आयोजित भाजप उमेदवाराच्या जाहीर सभेत ते बोलत होते. शहा पुढे म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकाळात देशात आतंकवाद माजल्याने सर्वत्र दहशत निर्माण झाली होती. या दहशतीला संपवणे गरजेची बाब बनली असतानाच सन 2014 मध्ये भाजपप्रणित मोदी सरकार सत्तेवर येताच देशातील दहशतवाद संपविण्याचे प्रयत्न सुरू झाले. 70 वर्षांच्या काळात काँग्रेसने राम मंदिराचे भांडवल करून मते मिळवण्याचा प्रयत्न केला. पण खऱ्या अर्थाने मोदी सरकार अस्तित्वात येताच अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन करण्यासह राम मंदिराची उभारणी करून देशात रामराज्य निर्माण केले आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रण देऊनही ते आले नाहीत, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. भाजपने 10 वर्षांच्या काळात देशातील प्रमुख मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे. येत्या काळात भरीव स्वऊपाचा विकास करण्याचे नियोजन केले आहे. केंद्र सरकारने 6 हजार व राज्य सरकारने 4 हजार असे एकूण 10 हजार ऊपये शेतकऱ्यांसाठी सहाय्यधन देण्याची योजना राबविण्यात येत आहे.
नदीजोड प्रकल्प राबविणार...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 हजार कोटी ऊपयांची तरतूद करून नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नदीजोड प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर हाती घेतल्यानंतर आगामी 5 वर्षात पूर्ण केले जाईल. या उपक्रमातून देशातील पाणी समस्या कायमस्वऊपी निकालात काढण्यात येणार असल्यामुळे देशातील कोरडवाहू जमीन ओलिताखाली आणून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधली जाणार असल्याचे शहा यांनी सांगितले.
विवेकराव पाटील यांचा भाजप प्रवेश
रायबाग विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विवेकराव पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विवेकराव पाटील यांच्या गळ्यात भाजपची शाल घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.