घोटाळेबाजांची दहशत!
दहशतवादी संघटना, नक्षलवादी संघटना यांच्याकडून देशाला धोका आहे. मात्र खऱ्या अर्थाने सध्या देशाला धोका आहे तो घोटाळेबाजांचा. या घोटाळेबाजांचा वेळीच बंदोबस्त करण्याला प्राधान्य द्यावे लागेल. अन्यथा घोटाळेबाजांच्या या दहशतीमुळे राष्ट्राची देखील हानी होण्याची शक्यता आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात घडलेल्या टोरेस घोटाळ्यामुळे जनसामन्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कष्टाने कमाविलेले पैसे ठगांच्या जाळ्यात अडकल्याने पुरती वाट लागली आहे. ज्या रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्या युक्रेनच्या या घोटाळेबाजाने देशातील जनसामान्यांना अक्षरश: लुटल्याने त्यांच्या विरोधात संताप निर्माण झाला आहे. सामान्य नागरिकांच्या कष्टाच्या रोजी-रोटीवर डल्ला मारत पाचही बोटे तुपात भिजविणाऱ्या या घोटाळेबाजांच्या मागे मुंबई पोलीस हात धुऊन लागली आहे. दिवसेंदिवस या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. भलेही यांच्यावर कारवाई होईल, हे तुऊंगात जातील मात्र ज्या कष्टाने हा पैसा उभा केला, त्या सामान्य नागरिकांचे काय? त्यांना त्यांच्या कष्टाचा पैसा परत मिळेल का? अशा नानाविध प्रश्नांची जंत्री तयार झाली आहे. मात्र घोटाळा कऊन अथवा फसवेगिरी कऊन ढापलेला पैसा परत मिळण्याची खूप कमी उदाहरणे आहेत. तसेच या घोटाळेबाजांचा देखील इतिहास खूप मोठा असल्याने, या घोटाळेबाजामुळे एक दहशत निर्माण झाली आहे.
देशाची आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती बिघडविण्याचा आटोकाट प्रयत्न हा दहशतवादी व नक्षलवादी संघटनांकडून सुऊ होता. मात्र या दोन घातकी संघटनांच्या जोडीला आणखी एक संघटना म्हटले तरी वावगे ठरणार नाही, अशी संघटना उदयाला आली आहे. ती संघटना म्हणजेच घोटाळेबाजांची संघटना. ललित मोदी, मेहुल चौक्सी, हर्षद मेहता, केतन पारेख, विजय मल्ल्या, दीपक तलवार, संजय अगरवाल, भ्रष्टाचारी दिवंगत अब्दुल करीम तेलगी या घोटाळेबाजांनी भ्रष्टाचार तर केलाच, मात्र बँकांना देखील मोठ्या प्रमाणात चुना लावला आहे. यामुळे देशाला दहशतवादी, नक्षलवादी या घातकी संघटनांच्या धोक्यासह या घोटाळेबाजांचा देखील मोठा धोका असल्याचे वास्तव समोर आले आहे. ललीत मोदी, निरव मोदी, मेहुल चौक्सी, विजय मल्यासारख्या घोटाळेबाजांनी बँकांना आत्महत्या करण्याची वेळ आणीत स्वत: ते लंडन दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात ऐशोआरामाचे जीवन जगत आहेत. लक्झरीयस लाईफ कशाला म्हणतात, तर हे या घोटाळेबाजांकडे पा]िहल्यानंतर लक्षात येते. मात्र हा थोड्या दिवसांचा दिखावा असतो. त्यानंतर योग्यवेळी कर्माचे फळ मिळते. ज्या नागरिकांच्या कष्टांच्या पैशावर डल्ला मारला आहे, त्यांचा तळतळाट या घोटाळेबाजांना सहजासहजी जगु देत नाही. त्यात सध्या आणखी एकाची भर पडली आहे. ती म्हणजे टोरेस घोटाळ्याची. आत्तापर्यंत या घोटाळ्याची व्याप्ती 500 कोटींच्या पुढे गेली आहे. तर केवळ मुंबईच नाही तर पुणे, नाशिकसारख्या शहरातील नागरिकांना देखील या कंपनीने चांगलाच दणका दिला आहे. कमी रक्कमेवर डब्बल-तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविल्यानंतर ही रक्कम काही दिवस चुकतीदेखील केली. मात्र नागरिकांना सुटलेला हव्यासच त्यांना रसातळाला घेऊन गेला. तर अशाप्रकारची मानसिकता या कंपनीने तयारच केली होती. त्याचा यांना फायदा झाल्यानेच नागरिकांच्या लालसेचा त्यांनी गैरफायदा घेतला. विशेष म्हणजे या नागरिकांचा विश्वास बसावा म्हणून स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भरणा तर केलाच, मात्र या कंपनीचा मालक विदेशी असल्याने, नागरिकांची उत्सुकता ताणली गेली. कारण आपल्याकडे विदेशी नागरिकाबाबत एक प्रकारचे कुतुहुल असते. हे आपण पर्यटन ठिकाणी तसेच अनेक ठिकाणी पाहिले आहे. त्याचाच फायदा घेत टोरेसने अक्षरश: नागरिकांना लुबाडण्याचे काम केले. देशातील किंवा शहरातील हा काही पहिलाच घोटाळा नाही. तर यापूर्वी निरव मोदी या ठगाने अक्षरश: बँकांना रडविल्याचा इतिहास आहे.
देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदी याचे सुमारे 150 बोगस कंपन्यांशी संबंध होते, अशी माहिती आता समोर आली आहे. कंपनी व्यवहारविषयक मंत्रालय या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. हा घोटाळा 17 हजार 600 कोटींहून अधिकचा असल्याचे समोर आले. नीरव आणि मेहुल यांच्या कंपन्यांना बोगस एलओयू देणारे पीएनबीचे माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी आणखी एक खिडकी विभागाचा अधिकारी मनोज खरात तसेच नीरवचा ऑथोराइज्ड सिग्नेटरी हेमंत बट यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर मेहुल चौक्सीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. नीरव मोदीने या बँकांना 11 हजार कोटींना चुना लावल्याची बातमी समोर येत असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अफरातफर, घोटाळा किंवा फसवणुकीसाठी दर चार तासाला एक बँक कर्मचारी पकडला जातो आणि त्याला शिक्षा होते ही माहिती रिझर्व्ह बँकेने तयार केलेल्या एका डेटानुसार समोर आली आहे.
1 जानेवारी 2015 ते 31 मार्च 2017 या कालावधीत पब्लिक सेक्टरमधील बँकांच्या 5 हजार 200 कर्मचाऱ्यांना फसवणूक, घोटाळा, अफरातफर प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे. आरबीआयच्या डेटानुसार अफरातफरीच्या किंवा घोटाळ्याच्या प्रकरणांमध्ये अडकलेल्या या कर्मचाऱ्यांना दंड आकारला गेला व त्यांना नोकरीवरून काढूनही टाकण्यात आले. सध्या आरबीआय एप्रिल 2017 ते आत्तापर्यंत किती लोकांना अफरातफर किंवा घोटाळाप्रकरणी शिक्षा झाली याची माहिती गोळा करते आहे. सर्वाधिक फ्रॉड करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एसबीआयचे कर्मचारी पहिल्या क्रमांकावर आहेत. या घोटाळेबाजांनी संपूर्ण देश पोखऊन काढला आहे. शेअर मार्केटमध्ये कित्येक करोडोंचा घोटाळा केल्यानंतर हर्षद मेहता प्रथम प्रकाशझोतात आला होता. त्याला अटक केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच, त्याचा कारागृहात मृत्यू झाला. त्याच्या मृत्युने आणि घोटाळेबाजीपणामुळे शेअर मार्केटवर दूरगामी परिणाम झाले होते. याच घोटाळ्याची किड भारतीय लष्कराला देखील लागली आहे. प्रथम बोफोर्स तोफांच्या खरेदीत झालेला घोटाळा व राफेल विमानांच्या बाबतीत यापूर्वी झालेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे याची प्रचिती येते. ज्या देशातील नागरिकांची सुरक्षा लष्करावर आहे, ते ठिकाण देखील संधीसाधू घोटाळेबाजांनी सोडले नाही. यामध्ये लष्कराच्या शवपेटीपासून ते
हेलिकॉप्टर पर्यंतचा घोटाळा समोर आला होता.
तर यामध्ये लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे ढळढळीत वास्तव प्रकाशझोतात आले होते. तसेच राज्यात एकेकाळी आदर्श घोटाळ्यांनी उचल खाल्ली होती. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाणांनादेखील राजीनामा द्यायची वेळ आली होती. सरकारी बाबुंना हाताशी घेत, राजकारणी व उद्योजकांनी केलेल्या भ्रष्टाचार तसेच घोटाळेबाजीमुळे खऱ्या अर्थाने देशाची आर्थिक नाडी दाबली जात आहे. यामुळे याचा परिणाम हा समाजजीवन व राजकीय वातावरण गढूळ होण्यास होत आहे. यामुळे अशा घोटाळेबाजांच्या वेळीच मुसक्या आवळल्या तर यांची दहशत नाहीशी होऊन जाईल.
- अमोल राऊत