For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिबट्यांची दहशत

06:35 AM Nov 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
बिबट्यांची दहशत
Advertisement

मानवी वस्त्यांमधील प्रवेशामुळे जनमानसात भीतीचे वातवरण

Advertisement

बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्षाची अनेक उदाहरणे

गेल्या काही दिवसांत देशात तसेच महाराष्ट्रात बिबट्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये अनेकांचा बळी गेला असून, बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्षाने सध्या गंभीर रूप धारण केल्याचे दिसून येते. वाढत्या शहरीकरणामुळे बिबट्याच्या अधिवासावर परिणाम होत आहे. त्यातूनच इतर प्राण्यांची संख्या कमी झाल्याने बिबट्याने भक्ष्य म्हणून मनुष्य प्राण्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसत आहेत. महाराष्ट्रासह राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यात हा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात याकडे लक्ष वेधण्यासाठी रास्तारोकोही करण्यात आले. त्याचबरोबर नरभक्षक बिबट्याविरोधात मोहीमही राबविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्याच्या मारण्यास परवानगी देण्याची मागणीही सध्या जोर धरत आहे.

Advertisement

मागच्या काही दिवसांत उत्तराखंडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 9 जणांचा बळी गेला असून, यात एका शाळकरी मुलाचाही समावेश आहे. राजस्थानमध्येदेखील बिबट्याच्या हल्ल्यात दहा जणांचा बळी गेला. कर्नाटक व मध्य प्रदेशमध्येही अशीच स्थिती आहे. तर महाराष्ट्रात बिबट्याचे हल्ले हा नित्याचा भाग झाला आहे. भारतात 50 वर्षापूर्वी शिकारीवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे गेल्या काही वर्षात बिबट्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.

वनखात्याच्या माहितीनुसार देशात सध्या 13,800 इतकी बिबट्यांची संख्या आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर या तीन तालुक्मयांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांची हालचाल प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या 25 वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात 55 जणांचा मृत्यू असून, 150 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या तालुक्मयांतील गावांना ‘संभाव्य बिबटा आपत्ती प्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये कायमच भीतीचे वातावरण राहिले आहे. यात लहान मुलांसह अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकताच बिबट्याने एका चिमुकलीवर हल्ला केला. त्या हल्ल्यात तिचा हकनाक जीव गेला. त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रŽ ऐरणीवर आला आहे. या भागातील नागरिकांनी आपला रोष व्यक्त करीत रास्तारोको करून या नरभक्षक बिबट्याला मारण्याची विनंती केली. वनविभागाच्या प्रयत्नांनंतर अखेर या बिबट्याला मारण्यात यश आले आहे.

जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर हे तालुके पूर्वीपासूनच निसर्गसंपन्न आणि डोंगराळ भागांनी समृद्ध आहेत. घनदाट जंगल, उसाची शेती आणि वन्यप्राण्यांसाठी योग्य पर्यावरण यामुळे अनेक वन्यजीव आढळतात. यामध्ये बिबट्या हा सर्वाधिक चर्चेत राहिलेला प्राणी आहे. गेल्या काही वर्षांपासून या भागात बिबट्याचा मानवी वस्तीशी संपर्क वाढला आहे. त्यालाही कारणे आहेत. बिबट्याच्या उपलब्ध संख्येच्या प्रमाणात त्याचे भक्ष्य असणाऱ्या प्राण्यांची संख्या कमी दिसते. त्यात पाळीव प dराण्यांच्या सुरक्षेकरिता स्वतंत्र व सुरक्षित गोठे उभारण्यात आल्याने बिबट्यांनी आपला मोर्चा थेट वाड्यावस्त्यांकडे वळवला आहे. बिबट्या हा सामान्यत: लपून राहणारा, रात्री सक्रिय असणारा शिकारी प्राणी आहे. मात्र अलीकडील काळात जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर या तालुक्मयांमध्ये त्याचा वावर रस्त्यांवर, गावांमध्ये, उसाच्या शेतात, शाळेच्या परिसरातसुद्धा दिसून येतो. सकाळच्या किंवा दुपारच्या वेळीही बिबटे दिसू लागले आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे मानवाने जंगलावर केलेले अतिक्रमण, जंगलतोड, अनियोजित बांधकाम आणि शेतीचा विस्तार ही असल्याचे सांगितले जाते. माणिकडोह येथे राज्यात बिबट्या पालन केंद्र आहे. येथे पकडलेले किंवा जखमी बिबटे ठेवले जातात. मात्र, सध्या या केंद्रावरही क्षमतेपेक्षा जास्त बिबटे आहेत. यावरूनही बिबट्यांची संख्या किती आहे, हे दिसून येते. या परिसरात उसाचे प्रमाण जास्त असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. उसाचे दाट पीक त्यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण ठरते. त्यामुळे अनेक बिबटे उसाच्या शेतात निवास करतात. तेथे अन्न, पाणी, निवारा हे आवश्यक घटक त्यांना सहज मिळतात. यामुळे शेतकरी वर्गाला जीव मुठीत धरून शेतात काम करावे लागते. शेळ्या, कुत्रे, गायी, वासरे यांच्यावर होणारे हल्ले हे आता सामान्य झाले आहेत. अनेक वेळा बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. शासनाकडून नुकसानभरपाई दिली जाते. मात्र ती वेळेवर व पुरेशी मिळतेच असे नाही.

सामाजिक प्रश्न

सध्या दिवसादेखील बिबटे हल्ले करत असल्याने गावागावांमध्ये दहशत पसरली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये भीतीदायक वातावरण असून, त्यापोटी शाळेला खाडा करावा लागत आहे. बिबट्याग्रस्त गावांमध्ये मुली देण्यास पालक तयार नसल्याने युवकांच्या लग्नातही अडचणी येत आहेत. पुणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये बिबट्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी गळ्यात खिळ्याचे पट्टे घालून शेतात काम करण्याची किंवा फिरण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.

वनविभागही दक्ष

वनविभागाच्या जुन्नर वनपरिक्षेत्रात कुशल कर्मचारी, ट्रॅकिंग यंत्रणा, पिंजरे, सीसीटीव्ही पॅमेरे अशा काही साधनांची उपलब्धता असली, तरी त्यात वाढ होण्याची गरज आहे. अधिक मनुष्यबळ आणि आर्थिक स्त्राsत आवश्यक आहेत. वनविभागाकडून प्रशिक्षण, जनजागृती, शाळांमध्ये प्रबोधन यांसारख्या गोष्टी राबविण्यात येतात. पण, आगामी काळात अधिक व्यापक स्तरावर काम करावे लागेल.

उपाययोजना

बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी बिबट्यांची नसबंदी करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. देशात शिकारीवर फार पूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. मात्र, वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता बिबट्याची शिकार करण्याचा पर्यायही मांडला जात आहे. याविषयी पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी अलीकडेच सविस्तरपणे आपली भूमिका माध्यमांमध्ये मांडली आहे. भारतात शिकारीवर बंदी आणून पन्नास वर्षे झाली. पशुंची संख्या वाढणार आहे. मात्र ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. भारतीय पोलीस कायद्यातील कलम 100 आणि 103 नुसार स्वसंरक्षणार्थ दुसऱ्याला ठार मारण्याची परवानगी आहे. त्याच धर्तीवर बिबट्यांना मारण्याची परवानगी द्यावी, असे मत त्यांनी मांडले आहे. हा मुद्दाही लक्षात घ्यावा लागेल. वास्तविक बिबट्याच्या नावावर होणाऱ्या हल्ल्यांचे विश्लेषण होणे गरजचे आहे. मानवाने त्यांच्या अधिवासात हस्तक्षेप केल्याने आक्रमकपणे बिबटे आता मानवी वस्तीत येत आहेत. त्यामुळे सरधोपटपणे बिबट्यावर सर्व खापर फोडूनही चालणार नाही. एकेकाळी शिकारीच्या अतिरेकातून चित्त्यासारखा प्राणी भारतातून नामशेष झाला आहे. हे उदाहरण लक्षात घेऊन सुवर्णमध्य साधणे आवश्यक असेल.

‘प्रोजेक्ट वनचर : मनुष्य - प्राणी संघर्षा’चा अभ्यास आणि उपाययोजना

जागतिक विज्ञान दिवसाचे औचित्य साधून ‘प्रोजेक्ट वनचर’ या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मनुष्य आणि प्राणी संघर्षाच्या घटनांचे डॉक्मयुमेंटेशन सेंटर फॉर सिटीझन सायन्सचे (सीसीएस) स्वयंसेवक गेली दोन वर्षे सातत्याने करीत आहेत. सध्याचे प्राण्यांचे वाढते हल्ले आणि मानवी वस्तीतील वावरामुळे या प्रकल्पाचा उपयोजित भाग आम्ही तातडीने सुरू करायचे ठरवले आहे, असे त्यांनी सांगितले आहे. मानव-प्राणी संघर्षाच्या घटनांची संख्या कमी करून या संघर्षातून होणारे दोन्ही बाजूंचे नुकसान कमीत कमी करणे, हे या प्रकल्पाचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यासाठी लोकसहभागातून प्राण्यांच्या नोंदी, अभ्यास, पूर्वसूचना, बचाव आणि जनजागृती हे उपक्रम राबवण्यात येतील. सर्वप्रथम पूर्वसूचनेच्या आधरे मानवी जीविताची हानी रोखण्याला प्राधान्य देण्यात येणार असून, दीर्घकालीन अभ्यासातून मानव-प्राणी सहअस्तित्वासाठीच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील बिबटे, वाघ, गवे, हत्ती, रानडुक्करे, वानरे आदी सर्व प्राण्यांच्या वर्तनाचा, वावराचा अभ्यास ‘प्रोजेक्ट वनचर’मधून केला जाईल. या अभ्यासातून हाती येणाऱ्या तथ्यांच्या आधारे आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाच्या आधारे प्राण्यांपासून होणारे सर्व प्रकारचे नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना शोधल्या जाणार आहेत.

एकूणच बिबट्यांचे हल्ले आणि दहशत हा सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यातील मोठा प्रश्न होऊन बसला आहे. प्राणी संरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा असला, तरी मानव जातीच्या संरक्षणास सर्वप्रथम प्राधान्य द्यावे लागेल. निसर्गात प्रत्येक पातळीवर समतोल महत्त्वाचा असतो. तो थोडाही इकडे तिकडे झाला, तरी साखळी तुटते. मग प्राण्यांची संख्या कमी होवो अथवा वाढो. म्हणूनच हा समतोल साधण्यासाठी आवश्यक पर्यावरण व वातावरण राखण्याची जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल.

- अर्चना माने-भारती, पुणे

Advertisement
Tags :

.