भयकारी भूकंप
माणूस कितीही प्रगत झाला आणि तंत्रज्ञानाने निसर्गाला गवसणी घालू लागला तरी निसर्गाकडे अनेक गोष्टी रहस्यमय आणि अचानक तडाखा देणाऱ्या आहेत, आणि निसर्गाचा तोल आणि ताल बिघडत चालल्याने रोजच काहीना काही भयकारी समोर येते आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार मंगळवारी उत्तररात्री किंवा बुधवारी पहाटेपूर्वी रशियाला बसलेला भयानक भूकंपाचा धक्का असाच तडाखा देणारा आहे. यामुळे जग हादरले नसते तरच नवल. जपानला व अमेरिकेलाही या भूकंपाची झळ आणि तीव्रता जाणवली आहे. भूकंपानंतर त्सुनामी आणि नुकसानी, पाठोपाठ, अतिवृष्टी आणि महामारी असे दुष्ट चक्र सुरु होते. गेले अनेक दिवस रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध सुरु आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या निवडणूक प्रचार कॅम्पेनमध्ये आपण हे युद्ध थांबवणार असे अश्वासन दिले होते पण त्यातील काहीही झालेले नाही. उलट ट्रंप हीच अमेरिकेसह अवघ्या जगाला डोकेदुखी झाली आहे. ट्रंप यांनी सोमवारीच रशियाला पंधरा दिवसाची मुदत देऊन युद्धविराम करा अन्यथा रशियाला टेरिफ व अन्य मार्गाने धडा शिकवू असा इशारा दिला होता. रशिया लेचापेचा नाही. रशियाने युक्रेनवर गोळे डागून ट्रंप यांच्या इराद्यांवर पाणी टाकले होते. दरम्यान हा महाभंयकर भूकंप झाला आणि आता तेथे सायरनचे आवाज सुरु झाले आहेत. रशिया, जपान, अमेरिका या सर्वानाच या भूकंपाची आणि पाठोपाठ समुद्रात होणाऱ्या त्सुनामी व भयंकर महाकाय लाटांची भीती आहे. या लाटा समुद्राच्या तळातून वर येणार त्या किती मोठ्या असणार आणि त्यांचे तांडव कोठे कोठे होणार याचा अंदाज वर्तवला जातो आहे. पण हे सारे धडकी भरवणारे आहे. सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. समुद्रातील बोटी व खलाशी, मासेमार वगैरेना सुरक्षित बंदरावर आणले जाते आहे. पण भूकंप भयंकर असल्याने व त्सुनामीचे इशारे धडकी भरवणारे असल्याने कसोटी आहे. रशियाच्या पूर्व द्वीपकल्प कामचात्काला या अतिशय शक्तिशाली भूकंपाचा तडाखा बसला आहे. पाठोपाठ या परिसरात त्सुनामीचा फटका बसला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार रशियातील भूकंपाची तीव्रता 8.7 रिश्टर स्केल इतकी आहे. यानंतर रशियाच्या कुरिल कोस्टल आयलंड, जपानच्या होक्काइडो आणि अमेरिकेत त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसने भारतात त्सुनामीच्या धोक्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. दिल्ली परिसरात परवा भूकंपाचा धक्का जाणवला होता पण त्यात तीव्रता नव्हती, जपानमधील या भूकंपानंतर अनेक अफवा आणि भविष्यवाण्या यांना उत आला असला व वेगवेगळे दावे केले जात असले तरी त्यात तथ्य नाही. दरम्यान इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसने, या भूकंपामुळे भारत आणि हिंदी महासागराला त्सुनामीचा धोका नाही, असे स्पष्ट केले आहे. रशियातील हा भूकंप एकदाच होऊन तेथील भूमी स्थिर होईल असेही खात्रीपूर्वक सांगता येत नाही. भूगर्भीय हालचालीचा अंदाज देता येत नाही. उलट मोठ्या भूकंपानंतर लहान मोठे भूकंप होतात, भूगर्भातून आवाज येतात असा पूर्वानुभव आहे. आपल्याकडे कोयना व लातूर भूकंपानंतर तशी स्थिती होती. या पार्श्वभूमीवर रशिया आणि शेजारचे देश, पॅसिफिक महासागर परिसरात सावधानता आणि सतर्कता गरजेची आहे. बुधवारी पहाटे रशियाच्या पूर्वेला असणाऱ्या प्रदेशात 8.7 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानच्या हवामान संस्थेने सांगितले की, सुमारे 30 मिटर उंच त्सुनामीची पहिली लाट होक्काइडोच्या पूर्व किनाऱ्यावरील नेमुरोपर्यंत पोहोचली आहे. कामचात्का द्वीपकल्पातील रशियन भागातही नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. स्थानिक गव्हर्नर व्हॅलेरी लिमारेन्को यांच्या मते, पहिली त्सुनामी लाट पॅसिफिक महासागरातील रशियाच्या कुरिल कोस्टल बेटांवरील मुख्य वस्ती असलेल्या सेवेरो-कुरिल्स्कच्या किनारी भागात पोहोचली. त्यांनी सांगितले की, लोक सुरक्षित आहेत आणि दुसऱ्या लाटेचा धोका टळेपर्यंत त्यांना उंच ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. भूकंप गंभीर होता आणि गेल्या काही दशकांमधील सर्वात तीव्र क्षमतेचा होता’ असे कामचात्काचे गव्हर्नर व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी म्हटले आहे. त्यानी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु एका शाळेचे नुकसान झाले आहे, असे म्हटले. वाढते तापमान, बर्फ वितळण्याचा झपाटा, नवीन बर्फ निर्मितीत येणारे अडथळे आणि सुमुद्री पाण्यात होत असलेली वाढ जोडीला जगभर ढगफुटी, जलप्रलय, महाथंडी, महातापमान असे निसर्गाचे तांडव दिसते आहे. माणूस हुशार झाला आहे, स्वार्थी झाला आहे पण शहाणा झालेला नाही. निसर्ग वारंवार इशारे देतो आहे पण मानवजातीचे भान सुटले आहे. समुद्राची वाढणारी पाणीपातळी अनेक शहरे पाण्याखाली घेऊ शकते. शास्त्रज्ञांनी तसे इशारे दिले आहेत पण लक्षात कोण घेणार व पाऊल कोण उचलणार हा लाख मोलाचा प्रश्न आहे. एकूणच भय इथले संपत नाही हेच खरे पण आता या भयकारी भूकंप आणि त्सुनामी यामुळे काय होते, हे बघावे लागेल. त्सुनामीचे पाणी भूभागावर आले तर तेथील जमीन नापेर होते. भूकंपानंतर मनुष्यहानी होवू नये म्हणून सुरक्षित आसरा घेतला तरी वित्तहानी होतेच, त्सुनामी बाधित परिसरातील विमानतळे, इमारती, पायाभूत सुविधा यांचे अतोनात नुकसान होते. श्रीमंत, धनदांडगे देश असे नुकसान सोसतीलही पण जगापुढे नैसर्गिक आपत्ती आणि वसुंधरेचा बिघडत चाललेला तोल हा चिंतेचा विषय आहे तो रोज अधोरेखित होतो आहे.