For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काश्मीरमध्ये पर्यटकांवर भीषण हल्ला

06:58 AM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
काश्मीरमध्ये पर्यटकांवर भीषण हल्ला
Advertisement

धर्म विचारुन घेतले 26 जणांचे प्राण, या कूर हल्ल्याचा सूड घेण्याचा केंद्र सरकारचा निर्धार

Advertisement

वृत्तसंस्था / श्रीनगर

जम्मू-काश्मीरच्या पेहलगाम येथे बैसनर खोऱायात भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात भारताच्या विविध भागांमधून आलेल्या अनेक पर्यटकांना प्राण गमवावे लागले आहेत. तीन ते चार दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. पर्यटकांचा धर्म विचारुन त्यांना गोळ्या घालण्यात आल्या, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याची निंदा केली असून शहशतवाद्यांना धडा शिकविला जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. अनेक मान्यवरांनी या हल्ल्यावर संताप व्यक्त केला.

Advertisement

मृतांची संख्या 26 असल्याचे वृत्त असून ही संख्या वाढूही शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. हल्ला झाल्यानंतर त्वरित आपत्तीनिवारण कार्याला प्रारंभ करण्यात आला. तथापि, हा भाग दुर्गम असल्याने आपत्तीनिवारण कार्यात अडथळे येत असून त्यावर मात करण्याचा प्रयत्न सैनिकांकडून करण्यात येत आहे.

दुर्गम भागात हेरुन हल्ला 

पेहलगाम हा भाग डोंगराळ असून जेथे हे पर्यटक पोहचले होते, तो भागाकडे केवळ घोडा किंवा पायी चालत जाता येते. तेथे जाण्यासाठी वाहनांची सुविधा नाही. त्यामुळे आपत्तीनिवारण कार्याला विलंब लागत आहे. तरीही हल्ला झाल्यानंतर त्वरित भारतीय सेना आणि सीमा सुरक्षा दलाचे सैनिक तेथे पोहचले होते. हे स्थान पेहलगाम येथील एक प्रसिद्ध पर्यटक केंद्र आहे. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचेही प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून चौकशीला प्रारंभ झाला आहे.

कसा झाला हल्ला...

पेहलगाम येथील एका दुर्गम स्थानी साधारणत: पन्नास ते साठ पर्यटक जमा झाले होते. मंगळवारी दुपारी त्यांच्याजवळ काही दहशतवादी आले. पर्यटकांना त्यांनी घाबरविले आणि त्यांना धर्म आणि नाव विचारुन हिंदू पर्यटकांवर निवडकरित्या हल्ला करण्यात आला.  साधारणत: पन्नास ते साठ गोळ्या झाडण्यात आल्या असाव्यात असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. या गोळीबारात सापडलेले पर्यटक गंभीर जखमी झाले. त्यांच्यापैकी काही जणांना जागीच, तर काही जणांचा नंतर रक्तस्रावाने मृत्यू झाला. काही जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार होत असून अनेक पर्यटकांचा जीव वाचला आहे.

हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुटका

हल्ला झाल्यानंतर त्वरित सीमा सुरक्षा दलाकडून पर्यटकांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर कामाला लावण्यात आले. त्यामुळे काही पर्यटकांची सुटका करणे शक्य झाले. काही लहान मुलांची आणि त्यांच्या कुटुंबियांचीही सुटका करण्यात यश आले. तथापि, 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती रात्री उशीरापर्यंत देण्यात आली होती. हल्ला झाला त्या स्थानी किती पर्यटक होते याची माहिती त्वरित देण्यात आली नाही. तथापि, 50 ते 60 पर्यटक असावेत, असे अनुमान आहे.

अमित शहा घटनास्थळी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना हे वृत्त समजताच त्यांनी त्वरित विमानाने श्रीनगरला प्रयाण केले. त्यानंतर त्यानी पेहलगाम येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. आता सुरक्षा सैनिकांनी या संपूर्ण भागाला वेढा दिला असून दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली जात आहे. दहशतवाद्यांनी नेमके दुर्गम स्थळ हेरुन हा हल्ला केल्याचे दिसून येत आहे. हे स्थळ हा पेहलगामधील एक प्रसिद्ध पर्यटनबिंदू आहे. या स्थानी इतके पर्यटक आहेत ही माहिती दहशतवाद्यांना कोणी दिली, याचाही तपास केला जात आहे. अमित शहा यांनी श्रीनगरमध्ये उपचारांसाठी आणण्यात आलेल्या जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. या प्रदेशातील शांतता भंग करण्यासाठी हा क्रूर हल्ला करण्यात आला असून आम्ही आता स्वस्थ बसणार नाही असा स्पष्ट इशारा अमित शहा यांनी दिला आहे.

सूड उगवणारच...

निर्दोष पर्यटकांना लक्ष्य बनवून काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांपासून बहरलेला पर्यटन व्यवसाय संपविण्याचे कारस्थान असल्याचे या हल्ल्यातून स्पष्ट होत आहे. तथापि, ज्यांनी हा हल्ला केला आणि ज्यांनी त्यांना यात साहाय्य केले, त्यांना कदापिही सोडले जाणार नाही. भारताची सुरक्षा व्यवस्था या हल्ल्याचा सूड उगविल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार अमित शहा यांनी व्यक्त केला.

अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात असताना...

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे सहकुटुंब भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत. सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर व्यापक चर्चा केली होती. ते भारतात असतानाच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. अमेरिकेने नुकतेच भारताला तहव्वूर राणा या मूळच्या पाकिस्तानच्या दहशतवाद्याचे प्रत्यार्पण केले आहे. त्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अमेरिकेलाही संदेश देण्यासाठी हल्ल्याची ही वेळ निवडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. तपासातून परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

370 नंतरचा सर्वात मोठा हल्ला

2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ केला होता. त्यानंतरचा हा पर्यटक किंवा सामान्य लोकांवर झालेला पहिलाच भीषण दहशतवादी हल्ला आहे. काश्मीरमध्ये येण्यास पर्यटकांना भय वाटावे हा या हल्ल्याचा उद्देश असून काश्मीरमधील शांतता भंग करण्याचे हे कारस्थान असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आता भारत यावर कोणती कृती करणार याकडे साऱ्यांचे लक्ष असून स्थिती लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

स्थानिकांचा मेणबत्ती मोर्चा

या क्रूर हल्ल्याच्या निषेधार्थ पेहलगाम येथील स्थानिक जनतेने मंगळवारी रात्री स्वयंस्फूर्त मेणबत्ती मोर्चाचे आयोजन केले होते. पर्यटन हा या भागातील व्यवसाय असून त्या व्यवसायावर स्थानिकांचे पोट अवलंबून आहे. त्यांचा हा व्यवसाय काढून घेऊन त्यांना आपल्या अंकित करुन घेण्यासाठी दहशतवाद्यांनी हा ह्ल्ला केला असे मत अनेक स्थानिकांनीही व्यक्त केले आहे. दहशतवाद्यांना शोधण्याच्या कार्यात प्रशासनाला स्थानिकांचेही साहाय्य होत असल्याची माहिती देण्यात आली.

सीमेवर सैन्य सज्ज

हा हल्ला झाल्यानंतर काही वेळातच भारत-पाकिस्तान सीमेवर भारतीय सैन्याला सज्जतेचा आदेश देण्यात आला आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज रहा, असा हा आदेश आहे. सीमेवर भारतीय सेना सज्ज असल्याचे पाहून पाकिस्तानी सैनिकांनी बंकर्सचा आश्रय घेतल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

श्रीनगरमध्ये सुरक्षा बैठक

मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगरमध्ये सुरक्षा यंत्रणांसमवेत बैठक घेतली. दहशतवादाचा पुरता नायनाट करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपायांचा उपयोग करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यासाठी जे करणे अनिवार्य आहे, ते करण्याचा निश्चय करण्यात आला. पेहलगामच्या संपूर्ण वन विभागात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले आहे.

दहशतवादी हल्ल्याचा सूड घेणारच...

ड पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात दोन विदेशी पर्यटकांचाही मृत्यू

ड या हल्ल्याचा सूड घेणार, दहशतवाद्यांना धडा शिकविणार : अमित शहा

ड नाव आणि धर्म विचारुन दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर निर्घृण गोळीबार

ड आपत्तीनिवारण कार्याला गती, जखमींवर उपचार, अनेकांचा वाचला जीव

Advertisement
Tags :

.