Miraj | मिरज-पंढरपूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
भोसे फाटा येथे दुचाकी आणि कारची जोरदार धडक
सांगली : सोनी मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वर भोसे फाटा, येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत दुचाकीस्वार हेल्मेट परिधान न करता भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याचे प्रथम दर्शनी तपासात दिसून आले.
मिरज ते पंढरपूर रोडवर भोसेच्या हद्दीत भोसे फाट्याजवळ अपघात घडला. संदीप बबन भोसले (वय ३७, रा. मानमोडी ता. मिरज) हा इसम हिरो डिलक्स (क्र. MH10 CD ०१५६) ही दुचाकी बिना हेल्मेट आणि वेगाने चालवत होता. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने आपल्या समोर जात असलेल्या एक्सयूव्ही (क्र. MH १० DV ४४४७) या चारचाकी वाहनाला मागून धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार संदीप भोसले याचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर सोबत असलेला अन्य एक इसम दादासाहेब आप्पासाहेब पवार (वय ३२, रा. मुळ गाव मंगळसुळी, सध्या यशवंतनगर ता. मिरज) गंभीर जखमी झाला आहे.
अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सपोनि श्रीकृष्ण नाबले, पोउपनि युबराज पाटील, पोउपनि शिरसाठ, पोकों शिंदे आणि पोकों कुमरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत. वाहतूक विस्कळीत झाली होती, ती तातडीने सुरळीत करण्यात आली आहे. या अपघातात दुचाकीस्वार संदीप भोसले हा हेल्मेट न घातल्यामुळे मृत्युमुखी पडला असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.