अंकोला तालुक्यात भीषण अपघात, दोघे जागीच ठार : 9 गंभीर जखमी
कारवार : कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस आणि टँकर यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले, तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी अंकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 वरील केंचीनबागील येथील हॉटेल तरंग जवळ हा अपघात घडला. बसमधील ठार झालेल्या व्यक्तींचे नाव भास्कर गावकर (रा. केणी, ता. अंकोला) असे आहे. या अपघात टँकर चालकाचाही मृत्यू झाला असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. अंकोला तालुक्यातील मक्कीगदे येथून अंकोलाकडे निघालेल्या परिवहन महामंडळाच्या बसला अंकोलाहून यल्लापूरकडे भरधाव निघालेल्या टँकरने जोराची धडक दिली. त्यामुळे टँकर चालक आणि बसमधील एक प्रवासी जागीच ठार झाले. बसमधील अन्य 9 प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना अंकोला येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसचालकाचा पाय तुटल्याचे सांगण्यात आले. अपघात इतका भीषण होतो की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या अपघातामुळे हुबळी-अंकोला राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 वरील वाहतुकीमध्ये काही काळ व्यत्यय निर्माण झाला होता. अंकोला पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला.