अमेरिकेत भीषण दुर्घटना, 4 भारतीयांचा मृत्यू
कार जळून झाली खाक : डीएनएद्वारे पटविली जातेय ओळख
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये 5 वाहने परस्परांना धडकल्याने मोठी दुर्घटना झाली आहे. या भीषण दुर्घटनेत एका महिलेसमवेत 4 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व भारतीय एका कारपूलिंग अॅपद्वारे जोडले गेले होते आणि अरकंसासच्या बेंटनविले येथे जात होते. दुर्घटनेतील सर्व मृतदेह जळाले आहेत. अशा स्थितीत मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी आता डीएनए चाचणीची मदत घेतली जात असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एका भरधाव ट्रकने एका एसयुव्हीला मागून धडक दिली होती. या एसयुव्हीतूनच हे सर्व भारतीय प्रवास करत होते. मृतांची नावे आर्यन रघुनाम ओरमपति, फारुख शेख, लोकेश पलाचरला आणि धार्शिनी वासुदेवन अशी आहेत. ओरमपति आणि त्याचा मित्र फारुख हा डलास येथे स्वत:च्या चुलत भावाला भेटून परतत होते. तर लोकेश पलाचरला हा स्वत:च्या पत्नीला भेटण्यासाठी बेंटनविले येथे जात होता. धार्शिनी वासुदेवन ही बेंटनविले येथील स्वत:च्या काकाला भेटण्यासाठी जात होती. हे सर्वजण कारपूलिंग अॅपच्या माध्यमातून जोडले गेले होते. याच अॅपद्वारे अधिकाऱ्यांना त्यांच्याविषयी माहिती प्राप्त झाली आहे.
विदेश मंत्र्यांकडे मागितली मदत
धार्शिनीच्या वडिलांनी भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांना एका ट्विटर पोस्टमध्ये टॅग करत स्वत:च्या मुलीचा शोध लावण्यासाठी मदत मागितली होती. माझी मुलगी काही जणांसोबत एका कारपूलिंगवर निघाली होती आणि काही काळानंतर तिच्यासोबतचा संपर्क तुटला होता असे त्यांनी जयशंकर यांना टॅग करत म्हटले होते. तामिळनाडूची धार्शिनी टेक्सासच्या फ्रिस्को येथे राहत होती.
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ओरमपतिचे पिता सुभाषचंद्र रे•ाr हे हैदराबाद येथील मॅक्स अॅग्री जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे मालक आहेत. तर ओरमपतिचा मित्र फारुख हा हैदराबादचा रहिवासी होता. तीन वर्षांपूर्वीच तो एमएस करण्यासाठी अमेरिकेत गेला होता.