तऱ्हेवाईक ट्रम्प:कोणाला त्राही करून सोडणार?
तऱ्हेवाईक म्हणून कुप्रसिद्ध असलेले डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आणि अमेरिकेच्या मित्रराष्ट्रात एक प्रकारची धडकी भरली आहे. यात भारताचा अपवाद नाही. ट्रम्प म्हणजे एक बेभरवशाचे प्रकरण. एक अतिशय श्रीमंत उद्योजक पण त्याबरोबरच अतिशय भंपक आणि विक्षिप्त नेता. ते कधी काय करतील? कोठे काय करतील? याचा कोणालाच सुगावा लागत नाही. त्यांना ज्या बहुमताने निवडून देण्यात आलेले आहे त्यावरून अमेरिकेतील अंतर्गत परिस्थिती देखील फारशी चांगली नाही आणि लोकांना बदल हवा आहे, दिलासा हवा आहे असा होतो. हा दिलासा कितपत मिळणार? कोणाला मिळणार? ते येणारा काळ दाखवणार आहे.
फिलाडेल्फिया आणि शिकागोमध्ये सुरु झालेली ट्रम्प विरोधी निदर्शने म्हणजे अमेरिकेतच या निवडणुकीने दुही वाढवलेली आहे असा होतो. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्रम्प निवडून आल्याने भारताची बल्ले-बल्ले झालेली आहे आणि त्यामुळे बरेच काही सकारात्मक घडणार आहे असे भासवले असले तरी प्रत्यक्षात काय घडणार याविषयी नवी दिल्लीत भरपूर धाकधूक आहे.
येणारा काळ अस्थिर असणार आहे कारण ट्रम्प साहेबांचे राग-लोभ अतिशय तीव्र. त्यामुळे त्यांच्या निर्णयांचे फटकेदेखील बसणार आहेत. गेल्यावेळी राष्ट्राध्यक्ष असताना ट्रम्प यांचे काही काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले जॉन बोल्टन यांनी त्यांच्याविषयी चांगले भाष्य केलेले आहे. ‘ट्रम्प यांचे कोणतेही तत्वज्ञान अथवा नीती नाहीत. त्यांचे वागणे हे ट्रान्सक्शनल (व्यवहारवादी) असते’. याचा अर्थ ज्यामुळे अमेरिका या नात्याने माझा जास्तीतजास्त फायदा कसा होईल एव्हढेच ते बघणार. त्यामुळे आपल्या मित्रांना काय तोटा होईल आणि जगाचे काय नुकसान होईल हे बघणार नाहीत.
‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (मागा) हे ट्रम्प यांचे सूत्र ध्यानात घेतले तर अमेरिकेच्या शत्रूंना तसेच मित्रांना देखील येता काळ आव्हानात्मक राहणार आहे. आपण करत आहोत तेच बरोबर असा फाजील आत्मविश्वास ट्रम्प यांचा असल्याने ते त्यांच्या नवीन कारकिर्दीत जगातील सगळ्यात वादग्रस्त नेते बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणाला आवडो अथवा नावडो, त्यांच्या निर्णयाचे पडसाद जगभर उमटल्याशिवाय राहणार नाहीत. बदलत्या जगात अमेरिका सुपरपॉवर राहिली आहे अथवा नाही या चर्चेला अर्थ नाही. तो देश जे ठरवतो त्याचे परिणाम जगभर होतात हे नाकारून चालणार नाही.
ट्रम्प सत्तेत आल्याने अमेरिकेचे यूरोपमधील मित्र हवालदिल झालेले दिसत आहेत. ‘आ बैल मुझे मार’, याप्रमाणे ट्रम्प हे युक्रेन-रशिया युद्धात भलतीच भूमिका घेऊन साऱ्या यूरोपियन देशांचा घात करतील अशी भीती त्यांच्यात आहे. ‘मी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर 24 तासाच्या आत रशिया आणि युक्रेन युद्ध संपुष्टात आणेन’ अशी त्यांनी केलेली घोषणा म्हणजे केजीबी या सोविएत गुप्तहेर संस्थेत काम करून मोठे बनलेले व्लादिमिर पुतीन हे गोड गोड बोलून ट्रम्प यांचा लवकरच मामा करतील असे मानले जाते.
गेल्यावेळी सत्तेत असताना उत्तर कोरियाचा फार मोठा बागुलबुवा ट्रम्प यांनी केला. पण प्रत्यक्षात घडले काय तर त्या वादग्रस्त देशाला कोणत्याही प्रकारे वेसण घालायला ट्रम्पसाहेबांना जमले नाही. नुकतेच त्यांनी 10,000 उत्तर कोरियन सैनिक युक्रेनबरोबरील युद्धात रशियाला मदत करायला पाठवून साऱ्या यूरोपलाच हादरा दिला आहे. गमतीची गोष्ट म्हणजे स्वत:ला रशियाचा जीवश्च कण्ठस्च मित्र भासवणारा चीनदेखील उत्तर कोरियाच्या या अजब खेळीने गोंधळात पडला आहे.
नाटो बंद करण्याची ट्रम्प नीती रशियाच्या वाढत्या धोक्याने युक्रेनमागे उभ्या राहिलेल्या युरोपियन राष्ट्रांचा केवळ विश्वासघातच होणार नाही तर त्यांच्या पुढे अचानक मोठे संकट उभे राहणार आहे. युरोपियन राष्ट्रांना नाटो राष्ट्र सुरक्षा योजना स्वत:च्या सुरक्षेसाठी अजून बळकट करून हवी असताना ट्रम्प साहेबांना नाटोलाच मूठमाती द्यायची आहे. अशामुळे युरोपमधील तणाव अभूतपूर्व रीतीने वाढू शकतात. अमेरिकेचे सुरक्षाकवच युरोपने हरवले तर तेथील देशांची पाचावर धारण होईल. कर्णाची कवचकुंडले गेली आणि कर्ण हतबल झाला तद्वतच युरोपचे होऊ शकते.
ट्रम्प हे इस्राएल धार्जिणे असल्याने त्यांच्या निवडीने मध्यपूर्वेतील तणाव शांत होण्याऐवजी वाढू शकतो. ट्रम्प हे औपचारिकरीत्या निवडून येण्यापूर्वीच इस्राएलचे वादग्रस्त पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी त्यांचे समाजमाध्यमांवर स्वागत करून दोन्ही देशातील मैत्री आता अजून वाढणार असल्याची दिलेली ग्वाही अरब जगतात, विशेषत: पॅलेस्टिनमध्ये धडकी भरवणारी आहे.
ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारी मैत्री आहे असे किती का गोडवे गायले जात असले तरी प्रत्यक्षात ट्रम्प कोणाच्या बापाचे नाहीत असे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील जाणकार सांगतात. ‘अब की बार ट्रम्प सरकार’ असा चार वर्षांपूर्वी मोदींनी त्यांचा अयशस्वी प्रचार केला असला तरी खाल्ल्या अन्नाला जागणारी त्यांची जात कुळीच नाही. ‘मागा’ योजनेकरिता भारत काय मदत करणार त्यावर भारताची पत अवलंबून असणार आहे. लोकलुभावण्या घोषणांनी सत्तेत आलेल्या ट्रम्प यांना अमेरिकेतील बेकारी दूर करायची आहे. त्याचे परिणाम इतरत्र काय होईल याचे त्यांना देणेघेणे नाही.
आता एच1बी व्हिसा प्रश्नावर देखील नवा गोंधळ वाढू शकतो. भारतातून बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाणाऱ्या लोकांवर ते वरवंटा चालवणार हे ठरले आहे. मेक्सिकोमधून अमेरिकेत बेकायदा आलेल्या लाखो लोकांना हद्दपार करण्याची जंगी मोहीम राबवण्याचा ट्रम्प यांचा इरादा आहे. त्याने अमेरिकन खंडातच वाद सुरु होणार आहे. ट्रम्प यांना अमेरिका आणि मेक्सिकोच्या सरहद्दीवर मेक्सिकोच्याच खर्चाने प्रचंड मोठी भिंत बांधायची आहे.
एलॉन मस्क या जगातील सर्वात श्रीमंत आणि हुशार उद्योजकाने हजारो कोटी डॉलर खर्च करून ट्रम्प यांच्या मोहिमेला खंबीर आधार दिल्याने नवीन सरकारात मस्कचे प्रस्थ जबरदस्त असणार आहे. जणू राष्ट्राध्यक्षाच्या बरोबर मस्कचा जलवा असल्याने भारताला त्यांना दादा बाबा करण्याची पाळी येणार आहे. याला कारण मस्क यांना बराच काळ भारतात आपल्या इलेक्ट्रिक मोटारीचे उत्पादन करण्याची जंगी फॅक्टरी टाकावयाची आहे. त्यात भारत सरकार विविध प्रकारे खोडे घालत असल्याने मस्क खुश नाहीत असे समजले जाते. काही महिन्यांपूर्वी ते भारताला भेट देऊन पंतप्रधानांना भेटणार होते अशी मोठी बातमी झळकली होती. अचानक मस्कसाहेबानी हा दौरा रद्द करून भारताचा पाणउताराच केला असे समजले गेले. भारताने इराण आणि रशियाकडून तेल आयात करायला ट्रम्प यांचा विरोध असल्याने त्याबाबत ते काय करतात हे येत्या काळात बघावे लागणार आहे.
ट्रम्पना चीनला धडा शिकवावयाचा आहे. चिनी मालावर त्यांनी आयातशुल्क वाढवले तर तो गप्प बसणार नाही आणि तो अमेरिकेला अडचणीत आणण्याची प्रत्येक संधी वापरू शकतो. जागतिक पातळीवर चीनचे वाढते वर्चस्व त्यांना खुपते आणि त्याला टाचणी लावायचा त्यांचा प्रयत्न राहील. पण शी जीन पिंग यांच्या नेतत्वाखालील चीन हा एक फार चतुर आणि कावेबाज देश आहे. चीनचे हिंद महासागर आणि विशेषत: दक्षिण चीन समुद्रातील वाढते वर्चस्व कमी करण्यासाठी QUAD हा अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा एक समूह अमेरिकेने बनवलेला आहे त्याबाबत ट्रम्प यांची काय भूमिका राहणार ते अजून स्पष्ट व्हायचे आहे. तैवानवर आक्रमण करून त्याला गिळंकृत करण्याची योजना चीनने अंमलात आणली तर ट्रम्प त्याला कसे तोंड देणार? याविषयीदेखील फारशी स्पष्टता नाही.
ट्रम्प यांच्या निवडीने भारतासह सर्वच मित्रदेशांना अमेरिकेबरोबर भावी काळात संबंध सुधारतील अशी आशा बाळगत असतानाच वाईटात वाईट काय होऊ शकते त्याला तोंड द्यायची तयारी ठेवावी लागणार आहे. ‘जमले तर सूत, नाही तर भूत’ असाच ट्रम्प साहेबांचा कारभार असणार असल्याने अमेरिकेच्या मित्र देशांना आपले हित साधण्यासाठी स्वत:च काम करावे लागणार आहे. तिथे कोणताच शॉर्टकट नाही.
सुनील गाताडे