बेळगावातील संतिबस्तवाड येथील घटनेने तणाव
धर्मग्रंथ जाळल्याचा प्रकार, चन्नम्मा चौकात धरणे, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
प्रतिनिधी / बेळगाव
संतिबस्तवाड (ता. बेळगाव) येथील प्रार्थनास्थळात ठेवलेल्या धर्मग्रंथाला आग लावल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सायंकाळी निदर्शने करण्यात आली. संशयितांना पकडण्यासाठी तीन विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून तीन दिवसांत आरोपींना अटक करण्याची ग्वाही पोलीस आयुक्तांनी दिली आहे. या घटनेनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून संतिबस्तवाड येथे अधूनमधून लहान-मोठ्या घटना घडत आहेत. सोमवारी सकाळी प्रार्थनास्थळापासून जवळच असलेल्या शेतवडीत धर्मग्रंथ अज्ञातांनी जाळल्याचे उघडकीस आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्वत: पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम., माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी यांच्यासह अनेक अधिकारी संतिबस्तवाडमध्ये दाखल झाले.
सोमवारी दुपारपासूनच गावकऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर संशयित आरोपींना अटक करण्यात येईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी दिली. या घटनेची माहिती बेळगावात पसरताच शेकडो वाहनांतून मुस्लीमबांधवांनी संतिबस्तवाडकडे कूच केली. संतिबस्तवाडहून बेळगावला परतताना सायंकाळी व्हीटीयुसमोर धरणे धरण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 6 पासून राणी चन्नम्मा सर्कल परिसरात धरणे धरण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्यांनी ग्वाही दिल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालय आवार व राणी चन्नम्मा चौक परिसरात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. धर्मग्रंथ पेटवणाऱ्यांना पकडून फाशी द्या, अशी मागणी केली जात होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ सर्कल, क्लब रोड, सदाशिवनगर, कॉलेज रोडहून चन्नम्मा सर्कलकडे येणारी वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली. परिस्थिती लक्षात घेऊन जादा कुमक मागवण्यात आली. रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास आमदार राजू सेठ यांच्या आवाहनानंतर धरणे मागे घेण्यात आले.
| संशयितांच्या अटकेसाठी तीन पथके नियुक्त यासंबंधी पत्रकारांना माहिती देताना पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग म्हणाले, बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. संतिबस्तवाड येथे गावकरी व मुस्लीम बांधवांची बैठक घेऊन आपण त्यांना या घटनेसंबंधी माहिती दिली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. संशयितांच्या अटकेसाठी तीन पथके नियुक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. |
| तीन दिवसांत आरोपींना अटक करा यापूर्वी संतिबस्तवाड येथे घडलेल्या घटनांची योग्य चौकशी झाली नाही म्हणून ही घटना घडली आहे. त्यामुळे तेथील पोलीस निरीक्षकावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार राजू सेठ यांनी केली आहे. पोलीस आयुक्तांनी आरोपींना अटक करण्यासाठी तीन दिवसांची मुदत घेतली आहे. तीन दिवसांत खऱ्या आरोपींना अटक झाली नाही तर पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असे सांगतानाच त्यांनी या घटनेचा निषेध केला. |