जांबोटी येथे ध्वज विटंबनेमुळे तणाव
जांबोटी पोलीस आऊटपोस्ट-ग्राम पंचायतीकडे भीम आर्मीच्यावतीने तक्रार
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी बसस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लावलेल्या निळा रंगाच्या ध्वजाची अज्ञातांनी विटंबना केल्याची घटना सोमवारी रात्री घडल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, जांबोटी बसस्थानकावर असलेल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जांबोटी ग्रा.पं.ची परवानगी घेऊन दलित बांधवांनी दोन वर्षांपूर्वी निळ्या रंगाचा ध्वज फडकाविला होता. समतेचे प्रतिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेल्या या ध्वजाबद्दल नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार नव्हती. जांबोटी येथील सर्व जातीधर्माचे नागरिक एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहतात. मात्र सोमवारी रात्री काही समाजकंटकांनी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील ध्वज काढून त्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली असून, ध्वज अन्यत्र फेकण्यात आल्यामुळे, जांबोटी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दलित बांधवांमधून सदर घटनेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. जांबोटी येथील निळ्या रंगाच्या ध्वजाची विटंबना करण्यात आल्याने बेळगाव जिल्हा भीम आर्मी एकता मिशनचे बेळगाव जिल्हा कार्यदर्शी नागेश कांबळे व जांबोटी विभागाचे अध्यक्ष राजू कुर्लेकर यांनी जांबोटी पोलीस आउट पोस्ट, तसेच जांबोटी ग्राम पंचायतीकडे लेखी तक्रार दाखल केली असून, या संदर्भात चौघा जणांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाहुबली व त्यांचे सहकारी तसेच जांबोटी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून सदर घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच ग्रा.पं.तर्फे नवीन ध्वज त्वरित उभा करण्याची ग्वाही दलित बांधवांना देण्यात आली. मात्र दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दलित बांधवांच्यावतीने दिला आहे.