दोन जमातींमध्ये पुन्हा मणिपूरमध्ये तणाव
चुराचांदपूरमध्ये 17 एप्रिलपर्यंत कर्फ्यू : वादग्रस्त ठिकाणी ध्वज फडकवल्याने वाद विकोपाला
वृत्तसंस्था/इंफाळ
दोन जमातींमधील वादामुळे मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात 17 एप्रिलपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला. वादग्रस्त जागेवर आपापल्या समुदायाचे झेंडे फडकवण्यावरून मंगळवारी झोमी आणि हमार जमातींमध्ये तणाव निर्माण झाला होता. सदर वादग्रस्त जागा व्ही मुनहोइह आणि रेंगकाई गावांमध्ये आहे. आता या गावांसोबतच नजिकच्या चार-पाच गावांमध्येही कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तथापि, अतिरिक्त फौजफाटा तैनात केल्यानंतर या भागात सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू शिथिल करण्यात आला आहे.
दोन समुदायांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही गावातील लोकांसोबत बैठक केली. याप्रसंगी हा वाद जातीचा नसून जमिनीचा असल्याचे दोन्ही समुदायाच्या लोकांनी सांगितले. त्यानंतर बैठकीत सहभागी प्रतिनिधींना शांतता राखण्याचे आणि अफवा पसरवू नये असे आवाहन करण्यात आले. यापूर्वी 18 मार्च रोजी ध्वज हटवण्यावरून दोन्ही जमातींमध्ये हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात हमार जमातीतील रोपुई पाकुमटे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
चुराचांदपूर उपविभागातील व्ही मुनहोईह आणि रेंगकाई गावांमधील वादग्रस्त भागात झोमी आणि हमार जमातीच्या लोकांनी झेंडे फडकवल्यानंतर चुराचांदपूरचे जिल्हा दंडाधिकारी धरून कुमार यांनी दोन मुख्य गावांसह समुलाम्लन, कांगवाई आणि सांगाईकोट उपविभागात संचारबंदी लागू केली. आता कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीच्या मूल्यांकनाच्या आधारे शिथिलतेचा आढावा घेतला जाणार आहे.