For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंतरधर्मिय विवाह योजनेमुळे तणाव

06:30 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
आंतरधर्मिय विवाह योजनेमुळे तणाव
Advertisement

उत्तर प्रदेशातील बरेली येथील घटना, प्रशासनाकडून कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था / बरेली

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील एक मौलाना तौकीर रझा खान याने हिंदू तरुणींचे मुस्लीम तरुणांशी सामूहिक विवाह घडविण्याची योजना घोषित केल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासनाची अनुमती मागितल्याचेही या मौलवीचे म्हणणे आहे. या कार्यक्रमाविरोधात स्थानिक हिंदू समाजाकडून निदर्शने केली जात आहेत. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर नोंद घेतली असून अशा कार्यक्रमाला अनुमती दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement

हा मौलाना इत्तेहाद-ई-मिलत कौन्सिल या राजकीय पक्षाचा सदस्य आहे. आठ हिंदू तरुणही धर्मांतर करून मुस्लीम तरुणींशी विवाह करण्यात तयार असल्याचा त्याचा दावा आहे. या सर्वांचा सामूहिक विवाह करण्याची त्याची योजना आहे. अशा 15 हिंदू तरुणी पूर्वीपासूनच मुस्लीम तरुणांशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याने मी त्यांचे विवाह लावून देणार आहे, असे त्याचे म्हणणे आहे.

योजना घोषित करताच तणाव

या मौलवीने सामूहिक विवाह कार्यक्रमाची घोषणा करताच बरेली शहर आणि परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. हिंदू संघटना आणि अनेक हिंदू नागरिकांनी या कार्यक्रमाच्या विरोधात निदर्शने करुन प्रशासनाने या सामूहिक विवाह आणि धर्मांतर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य यांनी निदर्शने करणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मौलानाने सामूहिक विवाह कार्यक्रमासाठी प्रशासनाची अनुमती मागणारा अर्ज सादर केला आहे. मात्र, या कार्यक्रमाला अनुमती देण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून गुप्तचर विभागाला तपास करुन अहवाल देण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मौलानाची सारवासारवी

आपल्या घोषणेमुळे तणाव निर्माण झाल्याचे समजताच मौलानाने सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला. हे तरुण-तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात आहेत, हे चुकीचे आहे. धर्माची अशा संबंधांना मान्यता नसते. त्यामुळे त्यांचा निकाह लावून देण्याची योजना मी आखली आहे, असे म्हणणे त्याने नंतर मांडले.

चंदीगढमधील प्रकरणामुळेही तणाव

चंदीगढमध्ये एक हिंदू तरुणी आणि मुस्लीम तरुणाच्या विवाहाचे प्रकरण अशाच प्रकारे गाजत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश तेथील न्यायालयाने दिला आहे. त्यांचा निकाह मशिदीत न करता ऑटोरिक्षात करण्यात आला. पण न्यायालयात तो मशिदीत केल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. ही बाब तपासात उघड होताच न्यायालयानेही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. हिंदू तरुणींचे घाऊक प्रमाणात धर्मांतर करण्याचे कटकारस्थान होत आहे का, याची चौकशी करुन अहवाल सादर करा असा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला आहे. चंदीगढमध्येही या प्रकरणामुळे मोठाच तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे.

Advertisement
Tags :

.