For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रुंदीकरण सीमांकनामुळे भोममध्ये तणाव

12:15 PM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
रुंदीकरण सीमांकनामुळे भोममध्ये तणाव
Advertisement

झाडांचे सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना रोखले : आंदोलक, अधिकारी,पोलिसांत शाब्दिक बाचाबाची: आंदोलनकर्त्यांना घेतले ताब्यात

Advertisement

वार्ताहर /माशेल

भोम येथे राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना झाडांच्या सीमांकन कामात अडथळा आणल्याप्रकरणी भोम येथील  शंभराहून अधिक ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने भोम येथे काल बुधवारी दुपारपासून तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन कुळे येथील पोलीस स्थानकात नेऊन ठेवण्यात आले आणि त्यानंतर बांधकाम खात्यातर्फे पोलीस फौजफाट्यात सीमांकनाचे काम सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे काल दिवसभर भोम येथे तणावग्रस्त वातावरण होते. प्राप्त माहितीनुसार अधिकारी सीमांकनासाठी भोम येथील श्रीसती देवस्थानसमोरील झाडांचे सर्वेक्षण करायला पोहोचले असता स्थानिकांनी अधिकाऱ्यांना थांबण्यास सांगून अडवणूक केली. स्थानिकांच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल अधिकाऱ्यांनी त्यांना न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र यावेळी अधिकाऱ्यांचे म्हणणे कोणीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. सकाळी दहाच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग विभागाने भोम येथे चौपदारीकरण कामाला सुरूवात केली. कुंडई ते भोमपर्यतच्या भागात रस्ता रूंदीकरणासाठी जी झाडे कापावी लागणार आहेत, त्यांच्या सर्वेक्षणास प्रारंभ केला. त्याला भामेवासियांनी विरोध केल्यामुळे वातावरण तापू लागले.

Advertisement

सकाळपासून सुरु शाब्दिक बाचाबाची

बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता हेमंत देसाई, संयुक्त मामलेदार रूचिका बिर्जे, पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर, म्हार्दोळचे पोलीस निरीक्षक, फोंड्याचे निरीक्षक तुषार लोटलीकर घटनास्थळी मोठ्या पोलीस फौजफाट्यासह तैनात होते. भोमवासीय महिला, अधिकारी व पोलीस यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. सीमांकनाच्या प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या आंदोलनकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेणे सुरु केले. त्यांना कुळे येथील पोलीस स्थानकात नेण्यात आले. सीमांकनाचे काम जेव्हा संपेल तेव्हा त्यांना सोडले जाईल, असा इशारा देण्यात आला. संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी पोलीस आणि महामार्ग अधिकाऱ्यांना आराखडा दाखविण्यास सांगितला. महामार्ग विस्तारीकरणाचा मुद्दा उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून कामालाही स्थानिकांनी आक्षेप घेतला.

जीव असेपर्यंत लढण्याचा निर्धार

आंदोलकांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दात सांगितले की ते त्यांची घरे, मंदिर आणि गाव नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी जीव असेपर्यत लढा देणार आहेत. यावेळी त्यांनी ‘आमका जाय बायपास’ च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला. पोलिसी कारवाईमुळे स्थानिकांनी चौपदारी महामार्ग नकोच बायपास करा असा आग्रह धरला. सरकारने आम्हाला फसविले असून पोलिसांच्या दहशतीत बळजबरीने सीमांकन करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.

तीन बसमधून शंभर जणांना उचलले

भोम गावात मागील काही महिन्यांपासून चौपदारी मार्गासंबंधी वाद सुरू आहे. स्थानिकांचा विरोध असतानाही सरकारी यंत्रणेने काल बुधवारी प्रत्यक्ष काम सुरू केल्याने लोक भडकले. त्यातच मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण पसरले. अडचणी निर्माण करणाऱ्या आंदोलनकर्त्याना पोलिसांनी अटक करण्याचा पवित्रा घेतल्यानंतर काही ग्रामस्थ व सरपंच दामोदर नाईक यांनी स्वखुषीने स्वत:ला अटक करवून घतले आणि आंदोलनकर्त्या महिलांना पाठिंबा दर्शविला. पोलिसांच्या तीन बसगाड्या भरून 100 हून अधिक आंदोलनकर्त्याना कुळेच्या दिशेने घेऊन प्रस्थान करण्यात आले. मात्र केवळ 22 जणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

Advertisement
Tags :

.