बलात्कार-हत्येच्या प्रयत्नामुळे तेलंगणात तणाव
आदिवासींकडून निदर्शने : धार्मिक स्थळावर दगडफेक : दुकाने पेटविली : इंटरनेट बंद
वृत्तसंस्था/आसिफाबाद
तेलंगणाच्या कुमुराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील जैनूरमध्ये 45 वर्षीय आदिवासी महिलेवर बलात्काराचा आणि तिची हत्या करण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेनंतर आदिवासी संघटनांनी तीव्र निदर्शने केली आहेत. बुधवारी या निदर्शनांदरम्यान दोन गटांमध्ये हिंसक झटापट झाली आहे. आरोपी आणि पीडित वेगवेगळ्या धर्माचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. निदर्शने करणाऱ्या सुमारे 2 हजार आदिवासींनी आरोपीच्या समुदायाच्या लोकांवर हल्ले करत त्यांची दुकाने पेटवून दिली. तसेच त्यांच्या धार्मिक स्थळावर दगडफेक केली आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल आरोपीच्या समुदायाच्या लोकांनी जाळपोळ आणि दगडफेक केली आहे.
तणावपूर्ण स्थिती पाहता जैनूर येथे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 163 लागू करण्यात आले आहे. स्थिती बिघडत असल्याचे पाहून प्रशासनाने या भागात इंटरनेट सेवा रोखत अधिक संख्येत पोलीस तैनात केले आहेत. बुधवारी रात्री शीघ्र कृती दलाला तैनात करत संचारबदी लागू करण्यात आली. इंटरनेट सेवा रोखल्यावर आणि संचारबंदी लागू केल्यावर प्रशासनाने दोन्ही समुदायांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी दोन्ही समुदायांच्या आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी गुरुवारी सातत्याने गस्त घालत स्थितीवर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हिंसेच्या तपासासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रिक्षाचालक मुख्य आरोपी
31 ऑगस्ट रोजी 45 वर्षीय आदिवासी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न एका रिक्षाचालकाने केला होता. महिलेने आरडाओरड सुरू केल्याने त्याने तिची हत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. या प्रयत्नात महिला बेशुद्ध झाल्याने आरोपीने तेथून पळ काढला होता. या महिलेला पोलिसांनी जैनूर रुग्णालयात दाखल केले होते, तेथून अधिक उपचारासाठी तिला हैदराबाद येथे हलविण्यात आले आहे. महिला शुद्धीवर आल्यावर तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
आदिवासी महिलेवर करण्यात आलेल्या क्रूर हल्ल्याने अत्यंत दु:खी आहे. पीडित परिवाराशी बोलून सहाय्य करण्याची तयारी दर्शविली आहे. तेलंगणाच्या पोलीस महासंचालकांकडे गुन्हेगार आणि हिंसेसाठी जबाबदार लोकांवर कारवाईची मागणी केली आहे. महिलांची सुरक्षा आणि आमच्या समुदायांमध्ये शांतता आमच्यासाठी सर्वोपरि आहे.
-केंद्रीय मंत्री संजय कुमार बंडी
जैनूरमधील हिंसेप्रकरणी पोलीस महासंचालकांशी चर्चा केली आहे. स्थितीवर नजर ठेवली जात असल्याचे आश्वसन पोलीस महासंचालकांनी दिले आहे. अतिरिक्त पोलीस जवान तेथे पाठविण्यात येत आहेत. कायदा स्वत:च्या हातात घेणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई होईल.
-हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी