गणेशोत्सवाच्या तोंडावर मजगावात तणाव
विळ्याने केलेल्या हल्ल्यात महिलेसह चौघे जखमी
बेळगाव : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मजगाव येथे विळ्याने हल्ला झाला आहे. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्यात महिलेसह चौघेजण जखमी झाले असून या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. उद्यमबाग पोलीस स्थानकात यासंबंधी पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मारुती गल्ली बसस्टॉपजवळ ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., उद्यमबागचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील व त्यांचे सहकारी मजगावात दाखल झाले. रात्री बंदोबस्त वाढविण्यात आला.
दिनेश अशोक काकतकर (वय 20), सुमन पेडणेकर (वय 45), मारुती उर्फ गण्या कृष्णा मजुकर (वय 22), किरण मधू पट्टण (वय 20, सर्व रा. मजगाव) अशी जखमींची नावे आहेत. सुरुवातीला त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. उपचारानंतर दोघा जणांना घरी जाऊ देण्यात आले आहे. तर दोघा जणांना खासगी इस्पितळात हलविण्यात आले. दिनेशवर विळा व चाकूने हल्ला होताना सोडविण्यासाठी आलेल्यावरही टोळक्याने हल्ला केला आहे. बुधवारी दिवसभर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गावात तणावपूर्ण शांतता होती. यासंबंधी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्याशी संपर्क साधला असता सध्या परिस्थिती शांत आहे. चौघा जणांना अटक करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
माहिती दडपण्याचा प्रयत्न
बेळगावकर गणेशोत्सवाच्या तयारीत असताना मजगाव येथे घडलेल्या या हल्ल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. उद्यमबाग पोलिसांनी मात्र हे प्रकरण व माहिती दडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या घटनेची पत्रकारांना माहिती मिळू नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर पोलीस यंत्रणा ढिली पडली की काय? असा संशय निर्माण झाला आहे. जानेवारीत झालेल्या मारामारीचे पर्यवसान मंगळवारी रात्री विळ्याने हल्ल्यात झाले आहे. पोलिसांनी त्या घटनेच्यावेळीच संबंधितांवर कारवाई केली असती तर अशा घटना टाळता आल्या असत्या. यंत्रणा पूर्णपणे ढिली पडल्यानेच अशा घटना वाढीस लागल्या आहेत.